पदव्युत्तर अध्ययनानंतर  नोकरी, स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी

सोमवार, 24 जुलै 2017

पदव्युत्तर पदवीनंतर पीएच.डी आणि पुढे अध्यापन, हे सूत्र आता बदलले आहे. कोणत्याही शाखेतून मास्टर पदवी मिळविली, की खासगी, संशोधन आणि सेवा क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. कशा आहेत या संधी, त्याविषयी सविस्तर माहिती देणारी मालिका आजपासून.

संशोधनाला मोठी चालना
विज्ञान आणि तंत्रज्ञान ही क्षेत्रे आता प्रगतीचा अविभाज्य भाग बनली आहेत. या शाखेतून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ अध्यापन हा एकमेव पर्याय राहिलेला नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे करिअरच्या अमाप संधी उपलब्ध आहेत. एम.एस्सी.नंतर पीएचडी केल्यास विषयानुसार संबंधित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संशोधक होता येते. स्टॅटीस्टिकल ॲनालिटिक्‍स, एन्व्हायर्न्मेंटल अकाउंटिंग, इलेक्‍ट्रॉनिक्‍स सिम्युलेशन, ऑनलाइन एज्युकेशन ही क्षेत्र खुली आहेत. त्यांचे अभ्यासक्रमदेखील आहेत. सोलर फार्मिंग, अणुऊर्जा या क्षेत्रातही पदव्युत्तर पदवीधारकांना मोठी संधी आहे. पूर्वी वस्तू तयार करण्यासाठी केवळ धातूंचा विचार होत असे. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे पदार्थविज्ञान क्षेत्रातही करिअरच्या मोठ्या संधी आहेत.

आपण कोणत्या विषयात एम.एस्सी. केले, याचा विचार करून संधी कोठे आहेत, याचा शोध घेतला, तर करिअरचे अनेक मार्ग सापडतील. त्यासाठी पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर आवश्‍यकतेनुसार कौशल्येही आत्मसात करावी लागतात.
- डॉ. के. सी. मोहिते, माजी अधिष्ठाता, विज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अकाउंटिंग, ऑडिटिंगमध्ये संधी
एम.कॉम.नंतर अकाउंटिंग आणि ऑडिटिंग क्षेत्रात मोठी संधी आहे. संस्था असो वा कंपनी, तिथे हिशेब आणि लेखा परीक्षण आहेच. त्यामुळे कंपन्या, वित्तसंस्था, कर सल्लागार संस्था या ठिकाणी नोकरीची संधी आहे; पण हीच कामे करण्यासाठी स्वतःची फर्म सुरू करून स्वंरोजगारदेखील करता येतात. याशिवाय, ऑनलाइन मार्केटिंग, फंड मार्केटिंग, स्टॉक ब्रोकिंग कंपन्या सुरू करण्याची किंवा या कंपन्यांमध्ये एक्‍झिक्‍युटिव्ह म्हणून काम करता येते. टॅक्‍स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी हीदेखील रोजगार, स्वयंरोजगाराची चांगली संधी आहे. नुकताच देशभरात जीएसटी लागू झाला, त्यामुळे वाणिज्य पदवीधरांना चांगले भवितव्य आहे. वाणिज्य विषयामध्ये पीएचडी करून संशोधन करण्याची द्वारेदेखील खुली आहेत.

केंद्र सरकारकडून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला उभारीसाठी होत असलेले प्रयत्न, परकी गुंतवणूक वाढविण्याकडे कल, याचा विचार करता पदव्युत्तर पदवीधरांनी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली, तर स्वयंरोजगाराबरोबरच नोकरीच्याही मोठ्या संधी आहेत.
- डॉ. बी. व्ही. सांगवीकर, प्रभारी विभागप्रमुख, वाणिज्य विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

भाषाविज्ञान, संशोधनात रोजगार
कला शाखादेखील व्यावसायिक होते आहे. अनेकजण कला- मानव्यविद्या शाखेत प्रवेश घेताहेत. भाषा- साहित्य विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्यांना विविध व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. मराठी आणि अन्य भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन शाळा- महाविद्यालयांमध्ये शिक्षक होण्याबरोबरच शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शैक्षणिक साहित्य आणि संसाधन निर्मितीत पाऊल ठेवता येते. ऑनलाइन एज्युकेशनसाठी अभ्यासक्रम तयार करण्याची संधी मिळू शकते. भाषा- साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास सरकारी परीक्षांद्वारे सरकारी संस्थांत नोकरी मिळवता येऊ शकते. भाषाविज्ञान (लिंग्विस्टिक्‍स) या विषयात पदव्युत्तर शिक्षणानंतर भाषाविषयक संशोधन प्रकल्पांत काम करता येते. विविध भाषिक ऑनलाइन व छापील वृत्तपत्रे, नियतकालिके, टीव्ही, आकाशवाणी या माध्यमांत करिअरच्या संधी आहेत. जाहिरात, कॉपीरायटिंग, जनसंपर्क क्षेत्रे हमखास रोजगार देतात. उत्तम वाणी, भाषेवर प्रभुत्व आणि चांगली लेखनशैली असेल, तर आरजे, निवेदक, भाषांतरकार, दुभाषी अशी कामे मिळतात. ग्रंथालयशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळविल्यास शिक्षण क्षेत्र, सरकारी आस्थापनांमध्ये ग्रंथालये, उद्योगसंस्था यांमध्येही ग्रंथपाल वा माहिती अधिकारी म्हणून काम करता येते. पुस्तक प्रकाशन, संपादन, अक्षरजुळणी, मुद्रितशोधन ही कामे मिळू शकतात. सामाजिक संशोधन, इतिहास, प्राच्यविद्या संशोधन करून रोजगार मिळविता येतो. पर्यटन, नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य, लोककला ही क्षेत्रेही पूरक आहेतच.

Web Title: pune news Career