'GI'मुळे पुरंदरचं अंजीर जागतिक बाजारपेठेत नेण्याची तयारी

श्रीकृष्ण नेवसे 
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

राज्य अंजीर संघाचे अध्यक्ष रविंद्र नवलाखांनी कार्यशाळेत शेतकऱयांना सहभागाचे केले आवाहन

सासवड : राज्यात व देशातही प्रसिध्द असलेल्या पुरंदर अंजीराला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील अंजिराला अनेक देशांची बाजारपेठ मिळणे सुलभ झाले आहे. येत्या काही काळात ग्रेडींग, पॅकींग व जीआय लोगो तयार करुन अंजिरास क्वालिटी टॅगमुळे ब्रँडचे संरक्षण होऊन अंजिरास जागतिक बाजारपेठेचे व्दार खुले झाल्याचे दिसेल. त्यासाठी नोंदणीकृत प्राप्तकर्ता असलेल्या अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक व संशोधन संघाने पुढाकार घेतला असून शेतकऱयांनी पुढे यावे., असे संघाचे अध्यक्ष रविंद्र नवलाखा यांनी सांगितले. 

अखिल महाराष्ट्र राज्य अंजीर उत्पादक व संशोधन संघाच्या वतीने गुरोळी (ता. पुरंदर) येथे अंजीर उत्पादकांसाठी कार्यशाळा झाली. त्यात श्री. नवलाखा बोलत होते. यावेळी कृषी तज्ज्ञ डाॅ. विकास खैरे, संघाचे नूतन उपाध्यक्षपदी रामचंद्र खेडेकर, सचिव सुरेश सस्ते, संचालक दिलीप जाधव, गोरख खेडेकर, अनंता खेडेकर, माऊली मेमाणे, विलास जगताप, संतोष जाधव, अरुण महाडिक, धर्माजी खेडेकर, हनुमंत खेडेकर, लक्ष्मण शिंगाडे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. यावेळी संघाच्या सभासद नोंदणीबाबत माहिती दिली. यानिमित्ताने लगेच 21 शेतकरी सभासद झाले. 

श्री. नवलाखा म्हणाले., `पुरंदर अंजीर` म्हणूनच ब्रँडच्या संरक्षणासह जगात हा अंजीर पोचेल. बाकी अंजीर तितका खपणार नाही. पुरंदरवाल्यांना तीन - चारपट भाव मिळेल. पुरंदरमधील नियोजित विमानतळामुळे तर या अंजिराला त्याहीपेक्षा अधिक भाव विमानतळ झाल्यावरही मिळेल. कितीतरी फळांना वा शेतीमालासही प्रयत्न करुन जी. आय. मिळाले नाही. दार्जिलींग चहाला जी. आय. मिळाल्याने त्याचे मुल्य किती वाढले.. ते पाहा. मग पुरंदरच्या अंजिराचे भवितव्य किती उज्वल आहे, ते हेरा. हे यश संघाचे व डाॅ. विकास खैरेंचे आहे. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी संघामार्फत सारेजण जगात पोचण्याची तयारी करुया. डाॅ. खैरे म्हणाले., नेहमीसारखा पारंपारिक अंजीर घेऊ नका. त्यात आपण गावोगावी अंजीर व्यवस्थापनावर कार्यशाळा, जागृती कार्यक्रम, शिवार फेरीचा उपक्रम करीत आहे. त्यात सहभागी होऊन शेतकऱयांनी अंजीर गुणवत्ता व उत्पादकता वाढ, पिकाचे आरोग्य सुधारणा, प्रतवारी, सुधारीत पॅकींग याचे तंत्र अवलंबवावे. त्यातून जागतिक बाजारपेठ लवकर काबिज होईल. त्याची बांधणी संघ व आम्ही सारे करीत आहोत. यावेळी श्री. सस्ते, दिलीप जाधव यांनीही मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रामचंद्र खेडेकर यांनी केले, सूत्रसंचालन गोरख खेडेकर यांनी केले., तर आभार अनंता खेडेकर यांनी मानले.

अंजीर संघ क्षेत्र वाढ, प्रक्रीया व एकत्रित वाहतुकीकडे वळणार
द्राक्ष, डाळींब, ऊस यांचे संघ मजबूत असल्याने त्या पिकांचे तेवढे आर्थिक उत्पादन आहे. त्याच तोडीचा अंजीर उत्पादक संघ करुन काम पुढे न्यायचे आहे. संघ याकामी अंजीर क्षेत्र वाढ, प्रक्रीया प्रकल्प वाढ, कोल्ड स्टोअरेज, एकत्रित वाहतुक व्यवस्थेकडे वळेल., असे संघाचे अध्यक्ष रविंद्र नवलाखा यांनी जाहीर केले.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news purandar figs anjir gets GI ready for global market