'संकट येण्याआधी, येईल वर्दीतील मित्र'; पोलिसांकडून 'हॅप्पी दिवाली' (व्हिडिओ)

पांडुरंग सरोदे
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

'दिवस असो वा रात्र, संकट तुझ्यावर येण्याआधी, येईल वर्दीतील तुझा मित्र' असा खंबीर विश्‍वासही पोलिसांनी दिला आहे. सध्या या व्हिडीओला पुणेकरांची चांगलीच पसंती मिळू लागली आहे.

पुणे : वर्षानुवर्षे एखाद्याच्या विनोदाचे साधन किंवा टिकेचा धनी हा पोलिसच ठरतो. कोणत्याही प्रसंगात पोलिस कणखर उभा असतो, पण त्याची दखल घेतली जात नाही. पोलिसही माणूस आहे, त्यालाही मन, भावना आणि कुटुंब आहेत, याचा सगळ्यांना पडतो.

नेमका हाच धागा पकडून पुणे पोलिसांनी पुणेकरांना दिवाळीच्या खास व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अवघी दीड मिनिटांची ही कलाकृती पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वतः साकारली आहे. त्याद्वारे 'दिवस असो वा रात्र, संकट तुझ्यावर येण्याआधी, येईल वर्दीतील तुझा मित्र' असा खंबीर विश्‍वासही पोलिसांनी दिला आहे. सध्या या व्हिडीओला पुणेकरांची चांगलीच पसंती मिळू लागली आहे. 

- पंढरपूर : दिवाळीतलं विठुमाऊलीचं हे रुप तुम्ही पाहिलंत का? (व्हिडिओ)

'इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा, तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल', महात्मा गांधींच्या या वाक्‍याने पुणे पोलिसांचा दिवाळीच्या शुभेच्छा देणारा हा व्हिडीओ सुरू होतो. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी, वाहतुक पोलिस, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस निरीक्षक या पदापर्यंतचे अधिकारी व कर्मचारी व्हिडीओमध्ये आपल्या समोर येतात.

'एका खाकीत किती रंग दडलेत' या शब्दातून रक्ताच्या नात्यांइतकेच खाकीचे नातेही दृढ करतानाच, 'ना सण, ना वार, ना सुट्टी, ना आप्तेष्टांची भेटी' या शब्दांनी पोलिसांच्या वेदना नकळतपणे पुढे येतात. 'ना वाऱ्याची पर्वा, ना पावसाची भिती' या शब्दातून कणखरपणा व्यक्त करतानाच 'दिवस असो वा रात्र संकट तुझ्यावर येण्याआधी येईल वर्दीतील तुझा मित्र' हे शब्द नवा विश्‍वास व्यक्त करीत असल्याचे व्हिडीओद्वारे स्पष्ट होते. त्यानंतर पोलिसातील माणसाकडून नागरीकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

- Celebrity Diwali : सिमरन खन्ना म्हणते, ‘दिवाळीत स्वतः लाडू तयार करणार’

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या व्हिडीओची संकल्पना पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्यासमोर मांडली. त्यांनीही मोठ्या आनंदाने हा व्हिडीओ करण्यास केवळ परवानगीच दिली नाही, तर चांगले पाठबळही दिले.

त्यानंतर पुणे पोलिस दलातील पोलिस वेगवेगळे पोलिस ठाणे, पथके, विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः शब्दरचना तयार केल्या, स्वतः त्या चांगल्या पद्धतीने सादर केल्या. त्याला साजेसे बॅकग्राऊंड म्युझिक पोलिसांनीच शोधून काढले. त्या व्हिडीओला 'व्हाईस ओव्हर' ही तितकाच दमदार मिळाला. या सगळ्यातून साकारलेल्या कलाकृतीद्वारे पुणेकरांना पोलिसांकडून मिळाल्या दिवाळीच्या शुभेच्छा. हा व्हिडीओ सध्या लोकप्रिय होत असून हजारो नागरिकांनी त्यास पसंती दिली आहे. 

- जनतेचा आम्हाला विरोधात बसावे असाच कौल : शरद पवार

पुणेकर व पोलिस एकाच कुटुंबाचा भाग आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ बनविला आहे. त्याद्वारे पोलिस व नागरीक यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police greet everyone for Diwali Festival with a special video