पावसाची भुरभुर... चित्तवेधक परेड... आणि जोरदार जल्लोष !

स्वप्निल जोगी
मंगळवार, 30 मे 2017

दिमाखदार पद्धतीने पार पडली 'एनडीए'ची 'पासिंग आऊट परेड'

पुणे: नुकतीच आपली पदवीपरिक्षा पार पाडलेल्या उण्यापुऱ्या विशीतल्या 'भावी लष्करी अधिकाऱयांच्या' डोळ्यांत, पायांत, फुफ्फुसांत अन खरंतर नखशिखांत भरलेला एक विलक्षण उत्साह... सिंहगडाच्या डोंगररांगांच्या कुशीत घुमणारा देशभक्तीपर संगीताचा निनाद... आणि सोबतीला कधी नव्हे ते पावसाच्या हलक्या सरींनी चोरपावलांनी केलेलं आगमन... अशा प्रसन्नचित्त वातावरणात 'एनडीए'च्या 132 व्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड' पार पडली...

दिमाखदार पद्धतीने पार पडली 'एनडीए'ची 'पासिंग आऊट परेड'

पुणे: नुकतीच आपली पदवीपरिक्षा पार पाडलेल्या उण्यापुऱ्या विशीतल्या 'भावी लष्करी अधिकाऱयांच्या' डोळ्यांत, पायांत, फुफ्फुसांत अन खरंतर नखशिखांत भरलेला एक विलक्षण उत्साह... सिंहगडाच्या डोंगररांगांच्या कुशीत घुमणारा देशभक्तीपर संगीताचा निनाद... आणि सोबतीला कधी नव्हे ते पावसाच्या हलक्या सरींनी चोरपावलांनी केलेलं आगमन... अशा प्रसन्नचित्त वातावरणात 'एनडीए'च्या 132 व्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड' पार पडली...

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल परेड ग्राऊंडवरचं वातावरण मंगळवारी सकाळी केवळ डोळ्यांत साठवून घ्यावं असंच होतं ! पासिंग आऊट परेड म्हणजे ज्या दिवसाची इथला प्रत्येकच विद्यार्थी मोठ्या आतुरतेने वाट पाहतो असा दिवस. शैक्षणिक आयुष्य संपवून या सगळ्यांना देशकार्यासाठी पुढे नेणारा हा दिवस. त्यामुळे पुढच्या आयुष्याची उत्कंठा आणि आजवर शिकलेल्या ज्ञानाची आणि कौशल्याची एक झलक उपस्थितांना दाखविण्याची शिस्तबद्ध तत्परता या सर्व कॅडेट्सच्या देहबोलीत दिसत होती. विद्यार्थ्यांच्या या चित्तवेधक परेडने उपस्थितांना थक्क केलं नसतं तरच नवल.

देशाचा अभिमान असणारी एनडीए पासिंग आऊट परेड साठी पहाटेपासूनच अगदी सज्ज झाली होती. काहीसं उजाडल्यावरच्या सकाळच्या हलक्याशा गारव्यात या परिसरातील वास्तू आणि तिथला एकूणच आसमंत अधिकच लक्षवेधी वाटत होता. अशा या वेळी पासिंग आऊट परेडचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांच्या दुचाकी अन चारचाकींनीही रस्ते भरून गेलेले दिसत होते. सोबतीला असणारी पावसाची सुखद भुरभुर परेडच्या आधीच मनातून 'वाह !'ची प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत होती...

व्ही. एस. सैनी हा विद्यार्थी प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल चा मानकरी ठरला. तर, संयम द्विवेदी हा सिल्व्हर मेडल आणि आकाश के. आर. हा ब्रॉन्झ मेडल विजेता ठरला. त्यांना भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

एनडीए चे कमांडन्ट एयर मार्शल जसजीत सिंग क्लेर, रिअर ऍडमिरल एस. के. ग्रेवाल, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरिझ, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, महापौर मुक्ता टिळक आणि अनेक महत्त्वाचे पाहुणे या सोहळ्यास उपस्थित होते.

दरम्यान, घोड्यांच्या पारंपारिक बग्गीमधून प्रमुख पाहुणे लांबा यांचं आगमन झालं. अनेकांचे डोळे या विशेष आगमनाकडे लागून राहिले होते. मंचावर आल्यानंतर लांबा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. त्याआधी त्यांनी कमांडन्ट क्लेर यांच्या सोबतीने संपूर्ण परेडची सलामी एका खास चारचाकीतून जात स्वीकारली. हे सारं कसं खास लष्कराच्या धाटणीच्या शिस्तीत आणि नियोजनबद्ध रीतीने घडत होतं. परेड संपल्यानंतर ऍडमिरल लांबा यांनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची आवर्जून भेटही घेतली.

पाऊस आणि परेड
सोबतीला पाऊस भरून आणलेले काळे ढग डोंगरांवर पहुडायला जणू परस्परांशी स्पर्धाच मांडत होते आणि या नितांतसुंदर पार्श्वभूमीवर परेड सुरू झाली होती... एकाच लयीतला पदन्यास, स्थिर पण तीक्ष्ण नजर आणि नियंत्रित हालचालींचा उच्चतम् नमुना दाखवून देणारी ! एनडीए चं प्रशिक्षण काय असतं, याची प्रचिती हा चित्तवेधक सोहळा पाहताना पावलोपावली येत होती...

सुपर डिमोना विमान, सारंग हेलिकॉप्टर
तीन वर्षांत सर्वोत्तम ठरलेल्या कॅडेट्सचा गौरव केल्यानंतर परेड सुरू होताना उंच आकाशात सूर मारत झेपावणारी हेलिकॉप्टर आणि 'सुपर डीमोना' ही खास विमानं पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचं शब्दशः पारणं फिटलं. विशेषतः त्यानंतरच्या कालावधीत सारंग हेलिकॉप्टर्स च्या पथकाने जी थरारक प्रात्यक्षिके दाखवली, ती पाहताना अनेकांच्या नजरा आकाशावरून काही केल्या हटतच नव्हत्या ! परेडच्या देखण्या पार्श्वभूमीवर सतत बँडच्या सुरेल तालावर ऐकू येणाऱ्या 'हम एनडीए के कॅडेट हैं'... 'सारे जहाँ से अच्छा'... 'देशो का सरताज भारत'... या धून ऐकताना मन प्रसन्न होत होतं.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: punew news nda pared and rain