जांभूळवाडी कोळेवाडी ग्रामपंचायतीत बोगस कामगार भरती; एका जागेसाठी दोन ते तीन लाखांची बोली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभूळवाडी कोळेवाडी ग्रामपंचायतीत बोगस कामगार भरती

जांभूळवाडी कोळेवाडी ग्रामपंचायतीत बोगस कामगार भरती

आंबेगाव बुद्रुक: मनपाहद्दी जवळील २३मगावांचा समावेश महापालिकेत नुकताच झाला आहे. तत्पूर्वी डिसेंबरमध्ये समावेशाबद्दल जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर लागलीच पालिकेत समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये बोगस कामगार भरती प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचातींमध्ये दिसून आले असले तर ग्रामस्थांनी 'तेरी भी चूप,मेरी भी चूप ' चा पवित्रा घेतल्याचे दिसून येते आहे. ग्रामपंचायतीतील कामगारांना पुढे पालिकेतील समावेशानंतर महापालिकेत नोकरीवर रुजू केले जाते. यापार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी बोगस भरत्या करून लाखो रुपये लाटल्याचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, या बोगस भरती मध्ये सरपंच, ग्रांमपंचायत सदस्य,ग्रामसेवक यांचेसह अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता आहे.

जांभूळवाडी कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीतही अशी बोगस भरती झाली असून, या बोगस कामगार भरतीमध्ये उमेदवारांकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. एका उमेदवाराकडून साधारणत: दोन ते तीन लाख रुपये घेण्यात आले आहेत. शिवाय, बोगस भरतीची चौकशी झालीच तर अत्यंत हुशारीने ग्रामपंचायतीचा ठराव, कामगार नोंदणी व हजेरी रजिस्टर यांसह बँकेतील पगाराचे स्टेटमेंटही संबंधित ग्रामपंचायतींनी तयार करून घेतले आहेत.

हेही वाचा: भोसरी जमीन घोटाळा: एकनाथ खडसेच्या जावयाला १५ जुलैपर्यंत ED कोठडी

जांभूळवाडी कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतींपैकी जांभूळवाडी गावाला महसूलकडून गावठाण दर्जा देण्यात आला असला तरी कोळेवाडी या गावाला अद्यापही गावठाण नाही.शिवाय दोन्ही ग्रामपंचायतींची मिळून असणारी लोकसंख्याही बोटावर मोजण्या इतकी असतानाच ग्रामपंचायतीने बोगस कामगार भरतीद्वारे पंचेचाळीस ते अट्ठेचाळीस बोगस कामगारांना कामावर रुजू करून घेतले आहे. यातील अठ्ठावीस उमेदवार हे स्थानिक नाहीत.ज्या ग्रामसभेमध्ये भरतीचे ठराव करण्यात आले होते. त्या ग्रामसभेची कोणतीही अधिकृत माहिती ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती.शिवाय, या भरतीला सदस्यांचा विरोध होतो आहे हे लक्षात आल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्या सदस्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती कामावर घेतले असल्याची माहिती मिळते आहे.

या बोगस भरती प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी व्हावी यासाठीचे अर्ज आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुणे महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना इमेल द्वारे करण्यात आले आहेत.

हेही वाचा: "संजय राऊत रॉकस्टार"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक

तुमची लायकी नाही !

ग्रामपंचायतींकडून बोगस भरती होताना जे उमेदवार पैसे भरू शकतील त्यांनाच कामावर घेतले आहे. तर कोळेवाडीतील आदिवासी उमेदवारांकडे पैसे नसल्याने त्यांना डावलण्यात आले आहे. शिवाय तुमची पैसे भरण्याची लायकी नाही अशा शब्दांत हिणवणूक करण्यात आली. अशाप्रकारे बोगस भरतीतही कोळेवाडीवर अन्याय झाला आहे.

लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार

  • जांभूळवाडी : ९७२

  • कोळेवाडी : ४५६

  • एकूण : १४२८

महापालिकेकडे दप्तर सोपविताना

ग्रामपंचायत कामगार संख्या : ५२

हेही वाचा: आईनंच बाळाला ५० हजाराला विकलं; अपहरणाचा बनाव उघडकीस

''नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. गोरगरीब उमेदवारांची याद्वारे मोठी फसवणूक झालेली आहे. याची योग्य ती चौकशी व्हायला हवी.आणि संबंधितांवर भा.द.वि. अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना शासन देखील व्हायला हवे. '

- ॲड. रवींद्र नरभवर, कायदेतज्ज्ञ

''ज्या ग्रामसभेत नोकर भरतीचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. त्या ग्रामसभांची कोणतीही अधिकृत माहिती कोळेवाडीतील ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. शिवाय दोन ते तीन वर्षांपूर्वीची कामगार नोंदणी करण्यात आली आहे. याची उच्च स्तरावर चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना इमेल केला आहे.''

-आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती

''महापालिकेकडून ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन सील करण्यात आले आहे. हे सगळे दप्तर हेड ऑफिसला जाणार आहे. तेथील निकषांनुसार पाडळताळणी झाल्यानंतर पात्र अपात्र उमेदवार ठरविण्यात येतील.''

-प्रज्ञा पोतदार, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय.

Web Title: Recruitment Of Bogus Workers In Jambhulwadi Kolewadi Gram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..