बारामतीत कऱ्हा माईने धारण केले रौद्र रुप!

मिलिंद संगई
Thursday, 15 October 2020

काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांचे पाणी कऱ्हा नदीला येऊन मिळाल्याने आज कऱ्हा माईने अक्राळविक्राळ रुप धारण केल्याचे बारामतीकरांनी अनुभवले. नदीचे रौद्र रुप अनेकांच्या मनात धडकी भरविणारे होते. 

बारामती : नाझरे धरणातून रात्री उशीरा चार हजार क्यूसेक्सने पाणी सोडल्यामुळे बारामतीत कऱ्हा नदीला मोठा पूर आला आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांचे पाणी कऱ्हा नदीला येऊन मिळाल्याने आज कऱ्हा माईने अक्राळविक्राळ रुप धारण केल्याचे बारामतीकरांनी अनुभवले. नदीचे रौद्र रुप अनेकांच्या मनात धडकी भरविणारे होते. नदीतून जाताना पाण्याचा जो प्रचंड आवाज होत होता, त्यानेही अनेकांना भीती वाटत होती. 

बारामती व कसब्याला जोडणाऱ्या पुलाला पाणी टेकले होते. विसर्ग वाढला तर हा पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता सकाळी नऊपर्यंत होती. अप्पासाहेब पवार मार्ग, दशक्रिया विधी घाट व नदीच्या कडेला असलेल्या सर्व स्मशानभूमी पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. अनेक सार्वजनिक शौचालयातही पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची पंचाईत झाली होती. 

Video:पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहत होतं पाणी; रात्री उशिरा पावसाची विश्रांती

काल दिवसभर बारामती शहरात मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शहराच्या विविध रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरुप आले होते. अनेक ठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेला होता. दुचाकीस्वारांना या पाण्यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते. 

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे बारामतीत आज रस्त्यावर गर्दीही तुरळक होती. अनेकांनी दुकाने न उघडता घरीच बसणे पसंत केले होते. बारामतीच्या बसस्थानकावरही शुकशुकाट होता. दरम्यान बारामती इंदापूर रस्त्यावर काल पावसाचे तांडव अनेकांनी अनुभवले. राज्य मार्गावर अनेक ठिकाणी ओढ्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती, काटेवाडीनजिक झाड रस्त्यावर पडल्यानेही वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. शहरातील सिध्देश्वर गल्लीतही पावसाने एक घर पडले, मात्र सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. काल रात्रीच कऱ्हा नदी काठच्या लोकांना बारामती नगरपालिकेने सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला होता, त्या मुळे जीवीत हानी झाली नाही. 

आणखी बातम्या वाचा 
मुसळधार पावसाने उडवली, पुणेकरांची झोप

पुण्यात रात्री काय घडलं? पाहा फोटो फिचर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The river Karha was flooded in Baramati