'आमचं कुटुंब एवढं मजबूत की नाद करणारेच...'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होउदे, पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की, आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अजित पवार या दोघांकडेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशातील अनेक राजकीय मंडळींचं लक्ष लागून राहिलं होतं.

कथित राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह इतर 70 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर राज्यात सुरू झालेल्या घडामोडींना अजित पवार यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर पूर्णविराम मिळाला.

यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा फेसबुकवर एक संदेश लिहलेली पोस्ट अपलोड केली आहे.  

यामध्ये ते म्हणतात की, तुमच्या आमच्यांपैकी जो कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो, त्याने आपल्या कुटुंबावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगी जी प्रतिक्रिया दिली असती, तितकीच प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणजे आदरणीय अजित दादांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा.

माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा, सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो, तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता, तर तुम्ही काय केलं असतं? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं, तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात.

मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की, पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होउदे, पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की, आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील. मी मागे पण सांगितलं आहे की, अजिबात कशाची काळजी करू नका, आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे, ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील. असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया.

अशा आशयाची पोस्ट रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पब्लिश केली आहे. यावर पवार कुटुंबियांच्या अनेक चाहत्यांनी तसेच हितचिंतकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. 

रोहित पवार यांचा रविवारी (ता.29) वाढदिवसदेखील आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रोहित पवार यांनी ही भावनिक पोस्ट अपलोड केली आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : पवारसाहेब अजितदादांच्या वडिलांसारखे : रोहित पवार

- व्यथित अजितदादांचे भावूक ‘कमबॅक’!

- माझी चिमुकली गेली; इतरांचे जीव तरी वाचवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar published a emotional post on Facebook