Unlock 1 : देशभरात दुकानांची वेळ एकच असावी; पाहा कुणी केली मागणी?

Pune-Shops
Pune-Shops

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडसह देशातील सर्व शहरांतील दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची एकच वेळ निश्चित करून ती जाहीर करावी, अशी मागणी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या भारतीय किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनेने सोमवारी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यांना त्यांच्या स्वत:च्या मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे मागणी आणि विक्रीवर तीव्र परिणाम होत आहे. ग्राहक आणि विक्रेते यांनाही असुविधांना तोंड द्यावे लागत आहे.

अनलॉक १.० दरम्यान दुकानांची व्याख्या बदलल्यामुळे कोणती दुकाने सुरू होणार व कोणती बंद राहणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मोठ्या स्टँडअलोन स्टोअर्सला गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि आसाममध्ये मॉल मानले जाते. त्याशिवाय कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूसारख्या राज्यांत स्टोअरमध्ये एअरकंडिशनर चालवण्यास बंदी आहे.

मार्च २०२० मध्ये अनावश्यक अर्थात नॉन इसेन्शियल किरकोळ विक्रीत तब्बल ५० टक्के घट झाली होती. हीच घट आता मे २०२० पर्यंत ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. देशाची जीवनरेखा असणारी अत्यावश्यक किरकोळ विक्री एप्रिलमध्ये ४० टक्क्यांनी खाली आली आहे आणि सध्याच्या परिस्थितीत ही विक्री आणखी ३० टक्क्यांनी जाऊ शकते. शिवाय, या दीर्घकाळ घटीचा परिणाम फक्त किरकोळ क्षेत्रापुरता मर्यादित न राहता उत्पादन आणि किरकोळ कामकाजावर अवलंबून असलेल्या अनेक संलग्न क्षेत्रावरही होतो आहे.

दुकाने पुन्हा उघडण्याच्या प्रक्रियेसाठीही एकसमान स्टँडर्ड ऑपरेटिंग पद्धती आवश्यक आहे. यामध्ये दुकाने उघडण्याची परवानगी, स्टोअर ऑपरेशन्सवरील वेळांचे निर्बंध, कर्मचारी आणि वितरण वाहनांची वाहतूक, उत्पादन किंमतीवरील निर्बंध, स्टोअरमध्ये अनुमती असलेले कर्मचारी आणि ग्राहकांची संख्या या सगळ्याचा समावेश असणे गरजेचे आहे.

या धोरणात देशभरासाठी एकरुपता गरजेची आहे, यावर भर देताना रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजागोपालन म्हणाले, “रिटेलर्स असोसिएशन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अनलॉक १.० च्या आदेशाचे स्वागत करते. या आदेशामुळे आता मॉल आणि सर्व प्रकारच्या किरकोळ वस्तू विक्री करणारी दुकाने उघडली जाऊ शकतात.

रिटेल उद्योगात जवळजवळ ४६ दशलक्ष लोक भारतात रोजगार निर्मिती करतात आणि पूर्वीप्रमाणेच हे काम सुरळीत चालू ठेवणे महत्वाचे आहे. हा उद्योग डबघाईला येण्याच्या उंबरठ्यावर आहे. कोट्यवधी रोजगार धोक्यात आहेत आणि आम्हाला अशा धोरणाची आवश्यकता आहे जे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न दाखवता पुन्हा दुकाने सुरू करण्यास मार्गदर्शक ठरेल. यासाठी आवश्यक वित्तीय आणि कायदेशीर बाबींचा समावेशही या धोरणात असणे अत्यंत गरजेचे आहे."

- पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांना व्यवसाय करणे सुलभ होणार नाही, तर ग्राहकांची सोय आणि सुरक्षितता देखील सुनिश्चित होईल. उदाहरणार्थ, यापुढे स्टोअरसाठी जास्त वेळ देता येऊ शकेल, जेणेकरून खरेदीसाठी लोकांना अधिकाधिक वेळ असेल. यामुळे गर्दी टाळण्यास मदत होईल. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेमध्ये वातानुकूलन किंवा स्टोअरमध्ये तापमान टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असावीत, ज्यामुळे कर्मचारी आणि ग्राहक दोघांचीही सोय होईल व उत्पादनांचा ताजेपणा आणि स्वच्छता राखण्यासही मदत होईल.

“किरकोळ विक्री सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आम्ही विविध सरकारी संस्थांशी संपर्क साधत आहोत आणि मॉलमधील खरेदीसाठी आता हरकत नसल्याच्या आमच्या मताशी सरकार सहमत असल्याचे पाहून असोसिएशनला आनंद वाटतो. अनलॉक १.० चे एकसमान पालन केल्यास राज्यांना गृह मंत्रालयाच्या निर्देशांची सुव्यवस्थित पद्धतीने अंमलबजावणी करण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा फायदा ग्राहकांना होईल आणि रिटेल उद्योग पुन्हा भरारी घेऊ शकेल, ”असेही गोपालन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com