ट्विटरवर 'रामायण'चा ट्रेंड असतो; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा का नाही...?

ट्विटरवर 'रामायण'चा ट्रेंड असतो; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा का नाही...?

पुण्याच्या कोंढव्यातून उत्तर प्रदेशाकडं चालत निघालेल्या स्थलांतरीत मजुरांची माहिती देणारा एक व्हिडिओ ट्विटरवर दोन दिवसांपूर्वी आला. मजुरांचं बोलणं एेकून तुमचं हृदय पिळवटून गेलं असतं. तेराशे किलोमीटवर चालत निघालेयत ते मजूर. काही थोड्या लोकांनी व्हिडिओ पाहिला. ट्विटरवर किंवा एकूणच सोशल मीडियावर कोणी फारसं काही 'बोललं' नाही. 

ट्विटरवर रोज कित्येक वापरकर्ते (युजर) पोलीस, प्रशासनाकडं प्रवासासाठी मदत मागताहेत. पुणे-पिंपरी चिंचवड शहरांमधल्या बाधित क्षेत्रात अडकलेल्या या लोकांना एकतर त्यांच्या कुटुंबियांची काळजी आहे किंवा त्यांना कुटुंबियांकडं, आपल्या गावी परत जायचं आहे. 

शेकडो लोकं स्थलांतरीतांबद्दल, अडकलेल्या लोकांबद्दल ट्विटरवर बोलताहेत असं काही दिसलं नाही. बोलत राहिले, ते सुट्या-सुट्या विषयांबाबत. व्यक्तिगत पातळीवर बोलत राहिले. ट्विटवर पुण्यात अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांबद्दल कुठं काही ट्रेंड आल्याचं पाहाण्यात आलं नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामायण मालिकेला टीव्हीच्या टीआरपीमध्ये विश्वविक्रम केल्याची बातमी गेल्या आठवड्यात धडकली. "रामायण' मालिका 16 एप्रिलला तब्बल 7.7 कोटी लोकांनी पाहिली, असं ट्विट डीडी न्यूजने केलं. रामायण मालिकेची लोकप्रियता तब्बल तीन दशकांनंतरही किती घट्ट आहे, याची प्रचिती जशी टीआरपी रँकिंगने दिली; तशीच गेले महिनाभर ट्विटरनंही दिलीय.  

गेल्या वर्षी गेम ऑफ थ्रोन्स या अमेरिकी टीव्ही मालिकेला सर्वाधिक 1.93 कोटी प्रेक्षक लाभले. एकाच मालिकेला इतके प्रेक्षक लाभण्याचा हा विश्वविक्रम. तो विक्रम रामायण मालिकेनं मागं टाकला. नवा विक्रम लगेच कोणी मोडेल, अशी शक्यता नाही कारण टीव्हीवर मालिका पाहण्याचं प्रमाण घसरत जाईल, अशी चिन्हे आहेतच. रामायण मालिका ट्विटरवर सातत्यानं ट्रेंडमध्ये राहिली. 

स्थलांतरीत मजूरांच्या व्यथा ट्रेंडमध्ये येत नाहीत...पुण्यात अडकलेल्या हजारो विद्यार्थी ट्रेंडमध्ये येत नाहीत. रामायण येते...रामायणामागं कोट्यवधींच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत, हे मान्य. त्यामुळं, ते ट्रेंडमध्ये आलं, याबद्दलही खात्री आहे. 

पण, मग रोज कुठल्या तरी जाती-धर्माविरुद्धचा गजर ट्रेंडमध्ये येतो आणि नागरीकांची रोजची जगण्याची तडफड ट्रेंडमध्ये येत नाही, त्याचं काय...? असं का होतं...?

ट्विटवर ट्रेंड आणण्यासाठी एकाचवेळी अनेक युजर्सनी एकाच विषयावर एकाच हॅशटॅगद्वारे 'बोलावं' लागतं. रामायण मालिका सातत्यानं ट्रेंडमध्ये राहिलीय, कारण त्याबद्दल लाखो युजर्स ट्विटवर लिहितात. मीम्स बनवतात. उजवे-डावे मिळून रामायणाबद्दल मतं मांडतात. रामायण चर्चेत राहातं. ट्विटरच्या अल्गॉरिदमचा हा परिणाम असतो. 

रामायण जसं चर्चेत राहातं, तसंच खोट्या 'बातम्या', अपमाहिती (डिस-इन्फॉर्मेशन) देखील याच अल्गॉरिदमच्या आधारानं फोफावतात. डोळ्यांनी पाहू, वाचू त्यावर चटकन विश्वास बसतो. ही सर्वसाधारण मानवी भावना. त्याचा गैरफायदा उठविणारे त्यांना हवी ती 'माहिती' खपवतात आणि अपमाहितीभोवती वास्तवाचा भास निर्माण करतात. 

ट्विटरच्या अल्गॉरिदमनुसार, वापरकर्त्याचा (युजर) ज्या प्रकारच्या आणि ज्या व्यक्तीच्या, संस्थेच्या अथवा विषयाच्या ट्विटशी सर्वाधिक संवाद असतो, ते ट्विट सर्वप्रथम दाखवले जाते. संवाद म्हणजे तुम्ही फॉलो करीत असलेल्या अकाऊंटवरचं पूर्वीची ट्विट वाचलंय, लाईक, शेअर केलंय किंवा ट्विटवर कॉमेंट केलीय. शिवाय, तुमच्या आवडी आणि भौगोलिक स्थान यानुसार हा अल्गॉरिदम बदलतो. मुंबईतून आणि न्यू यॉर्कमधून दिसणारा ट्विटर ट्रेंड वेगवेगळा असतो, असं सोप्या भाषेत सांगता येईल. 

आता इतकं सगळं मान्य करून मिळणारी माहिती सत्य आहे किंवा नाही, याबद्दल ट्विटर काहीच जबाबदारी घेत नसते. हीच गोष्ट फेसबूक, युट्यूब, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅपच्या बाबतीत असते. सोशल मीडिया वापरणाऱ्यानेच सोशल मीडियावरच्या माहितीची खातरजमा करावी, असा हा सोयिस्कर पवित्रा आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरात संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस आणि प्रशासन जीवावर उदार होऊन लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते आहे. अशा वेळी ट्विटरवर कोणीही येऊन "लस सापडली....', म्हणून घोषित करून ट्रेंडही आणू शकतो. 

कुठलं औषध वापरा आणि कुठलं पेय प्या, याबद्दल ट्विटरवर ट्रेंड येतात. 'माहिती'च्या वेष्टनात दडपून अपमाहिती हातोहात खपवण्याचा उद्योग राजरोज सुरू असतो. कोणी कुठं 'धर्मांतर' केलं याबद्दल काही घटक जाम जागरूक असतात. जगातल्या एका टोकाचा व्हिडिओ दुसऱ्या टोकातला म्हणून खपवून रिकामेही होतात. 

"न्यू यॉर्क टाईम्स'च्या अंकात गेल्या आठवड्यात जगभरातल्या संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय संशोधन संस्थांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या संस्थापकांना कळकळीचं आवाहन केलंय. "तुमच्या प्लॅटफॉर्मवरच्या माहितीचा जीवाला धोका आहे,' असं त्यांनी म्हटलंय. 

हा धोका आपणही ओळखला पाहिजे. वापर तर करायचा; त्याचवेळी तोतयांना आणि भामट्यांना रोखायचं, ही जबाबदारी ट्विटरनं नाही घेतली, तरी आपल्याला घ्यावीच लागणार आहे. अन्यथा, पुण्यातले विद्यार्थी, स्थलांतरीत मजूर इथंपासून ते आपले रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न ट्रेंडमध्ये आणावे लागतील. अन्यथा, अपमाहितीच्या ओझ्याखाली आपलेच प्रश्न दबून जातील...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com