Lockdown : मार्केट बंद; भाजीविक्री होणार आठवड्यातून फक्त दोनदा!

Bhaji-Mandai
Bhaji-Mandai

सासवड : घाऊक भाजीबाजार आणि फळबाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने नेहमीसारखी गर्दी होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे नागरिक सरकारने सांगितलेल्या नियमांकडे डोळेझाक करत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजीबाजार बंद करण्याचा निर्णय सासवड पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी घेतला. त्यामुळे कालचा घाऊक बाजार हा शेवटचा बाजार ठरला आहे. शिवाय शहरातील भाजी मंडई रोज भरविण्यावरही निर्बंध आणले असून फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी भाजीबाजार भरेल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. 

तहसिलदार रुपाली सरनौबत, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी आमदार संजय जगताप यांच्याशी मंगळवारी (ता.८) चर्चा केली. तेव्हा मुख्याधिकारी जळक यांनी बाजार न भरविण्याबाबतचा निर्णय बोलून दाखविला. त्यानुसार जळक यांनी पुरंदर तालुक्यासाठीचा मुख्यालयाचा हा घाऊक भाजीबाजार आणि फळबाजार बंद केला आहे. यातून जरी शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असले, तरी त्यांच्यासमोर पुढे शहरी भागात परवाना घेऊन शेतीमाल पाठविण्याचा पर्याय खुला आहे.

स्थानिक शेतकरीही परवाना मिळवून शेतकरी गटांव्दारे शहरी भागात जाऊन विक्री करु शकतात. मात्र सासवड शहरातील महात्मा फुले मंडईतील घाऊक भाजीबाजारात आणि फळबाजारात होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असे जळक यांनी स्पष्ट केले. बाहेरचे व्यापारी कोठूनही परगावांतून येत होते, तसेच घाऊक बाजारात प्रचंड गर्दी होत होती. त्याबाबत तक्रारी होत होत्या. त्यामुळे हा निर्णय धक्कादायक व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचा आहे.

याशिवाय सासवड शहरातील भाजी मंडई रोज भरविण्यासही निर्बंध आणले असून फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी भाजीबाजार सोशल डिस्टन्सिंग नियमानुसारच भरेल, असेही मुख्याधिकारी जळक यांनी स्पष्ट केले. त्यातही पालिका परवाना असलेल्या भाजीविक्रेत्यांना विक्री करण्यास परवानगी असेल. तसेच मास्क न लावल्यास विक्रेत्यास दंड होईल, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

घाऊक बाजारात कोटीची उलाढाल थांबणार...

सासवडच्या घाऊक बाजारात रोज सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण होईल. शहरी भागात माल पोचविताना साऱ्यांची सोय होणार नाही आणि वाहतूक खर्च वाढेल. त्यामुळे बळीराजा नुकसानीत जाईल. मात्र, कोरोना संसर्गातून बचावासाठी घाऊक बाजार बंदचा निर्णय महत्त्वाचा आहे, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com