सर्व्हर डाऊनमुळे 'अंतिम'च्या परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांनी कसाबसा पेपर केला सबमीट!

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 20 October 2020

सकाळच्या पहिल्या सत्रात किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता सर्व विषयांचे पेपर व्यवस्थित झाले. पण दुपारच्या दोन्ही सत्रात पेपर सुरू होताच काही वेळानंतर अचानक ऍप आणि संकेतस्थळ हॅंग झाले.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे सर्व्हर दिवसभरात दोनवेळा डाऊन झाल्याने सोमवारी (ता.19) परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला. अर्धवट पेपर सोडविलेल्या विद्यार्थ्यांना नेमके काय झाले समजत नव्हते. हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला, तेथूनही मदत मिळालीच नाही. 15 मिनिटांपासून ते तीन तासापर्यंत विद्यार्थ्यांनी खटाटोप करून कसाबसा पेपर पूर्ण केला. एजन्सीच्या कुचकामी सर्व्हरमुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर,ऑफलाइन परीक्षा सुरळीत पार पडली.

रांका ज्वेलर्सकडून पद्मावती देवीसाठी सुवर्णालंकार​

सकाळच्या पहिल्या सत्रात किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता सर्व विषयांचे पेपर व्यवस्थित झाले. पण दुपारच्या दोन्ही सत्रात पेपर सुरू होताच काही वेळानंतर अचानक ऍप आणि संकेतस्थळ हॅंग झाले. विद्यार्थ्यांनी रिफ्रेश करण्याचा प्रयत्न केला असता काहीच झाले नाही. परीक्षा सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनला फोन लावण्यास सुरवात केली. दोन्ही नंबरवरून फोन लागत नव्हता. जवळपास अर्ध्या तासानंतर पुन्हा परीक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांनी पेपर देण्यास सुरवात केली, पण शेवटी पेपर सबमीट होत नसल्याची समस्या आली. दुपारी चारच्या सत्रामध्येहीही अशाच प्रकारच्या अडचणी आल्या. चार वाजताचा पेपर विद्यार्थी सहा नंतरही लॉगइन करून पेपर देण्यासाठी खटाटोप करत होते.

झेप्टोसेकंद : वेळेचा सर्वात लहान भाग मोजण्यात शास्त्रज्ञांना यश!​

''सोमवारी दिवसभरात 223 विषयांची परीक्षा घेण्यात आली. कंपनीचे सर्व्हर दोन वेळा डाऊन झाल्याने परीक्षा घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. पण काही वेळाने सर्व्हर पुन्हा पूर्ववत झाले. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आम्ही सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत. तसेच एजन्सीला तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहेत.''
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा विभाग

''विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे सोमवारी 88 पेपर होते. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या आहेत. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका ऍटोमॅटिक सेव्ह होत आहे, त्यामुळे ज्यांना प्रॉब्लेम आले आहेत, त्यांनी घाबरून जाऊ नये.''
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता

''माझा फिजिकल केमेस्ट्रीचा पेपर होता, पेपर सुरूच होत नव्हता, मी हेल्पलाइला फोन केला, पण तो डायव्हर्ट होत होता किंवा कट केला जात होता. दोन तासापासून प्रयत्न करतोय पण पेपर देता आलेला नाही.''
- विद्यार्थी, बीएस्सी, पुणे

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन परीक्षेचा सराव करता येणार फ्रीमध्ये!​

परीक्षेत आलेल्या अडचणी
- सबमीटचा पर्याय निवडला तरी पेपर कंटीनीव असेच दाखवले जात होते.
- एरर 504 स्क्रीनवर येऊन प्रश्‍नपत्रिका गायब होत होती.
- एमबीए, इंजिनिअरिंग, बीसीए, बीबीए, बीएस्सी, एमकॉम, लॉसह आदी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी त्रस्त
- हेल्पलाइनवर कॉल वेटिंग असताना कट केला जातो, त्यामुळे संपर्कच होत नाही.

सोमवारी झालेल्या परीक्षेची आकडेवारी :
विषय - 223
ऑनलाइनसाठी अपेक्षित - 119000
परीक्षा दिली - 114995
ऑफलाइनसाठी अपेक्षित - 24818
परीक्षा दिली - माहिती उपलब्ध नाही

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University exam server went down causing confusion in exam once again