Welcome 2021: रस्त्यावर गर्दी माणसांची नव्हे, तर रंगीबेरंगी फुगे आणि पोलिसांची!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

रस्त्यावर नागरीकांची गर्दी होऊ नये यासाठी गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच शहरातील मुख्य रस्ते, चौकात पोलिसांचे समूह दिसत होते.

पुणे : कुठे रस्त्यावर, हॉटेल्समध्ये दिसणारी नागरीकांची तुरळक गर्दी. तर कुठे दोन-चार जणाचे ग्रुप, एखादे कुटुंब फिरताना, गप्पा मारताना दिसणारे चित्र. एरवी माणसांच्या गर्दीने फुलणाऱ्या याच रस्त्यावर यंदाही गर्दी होती, पण ही गर्दी होती..रंगीबेरंगी फुग्याची आणि ठिकठिकाणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांची. एकूणच काय, तर यंदाचा "थर्टी फर्स्ट"चा आनंद कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील पोलिसांच्या जमावबंदी आदेशाने पुरता हिरावला गेला होता. तरीही मिळालेल्या वेळेत बाहेर, तर उरलेल्या वेळेत घरच्यासमवेत सरत्या वर्षाला निरोप देत पुणेकरांनी 2021 या नव्या वर्षाचे तितक्याच आनंदात आणि उत्साहात स्वागत केले....!

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ!

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाचे बहुतांश सणाचे दिवस घरातच गेल्यामुळे नागरीक अक्षरश: त्रस्त झाले होते. मात्र काही उत्साही नागरीक गणेशोत्सव व त्यापाठोपाठ आलेल्या दिवाळीला घराबाहेर पडले. दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीने तर पुणेकर टिकेचे धनीही झाले. पण याच पुणेकरांनी "थर्टी फर्स्ट"च्या रात्री आपल्यातील सुजाण नागरीकत्वाचे दर्शन घडविले. 

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे राज्य सरकारने राज्यात जमावबंदीचे आदेश दिले होते. त्यातच "थर्टी फर्स्ट"ला रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. रात्री 11 वाजल्यानंतर हॉटेल्स, रेस्टोरंट, बार बंद करण्याबरोबरच 4 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र फिरण्यासही मनाई करण्यात आली होती.

CBSE Exam 2021: 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; वाचा सविस्तर

या पार्श्वभूमीवर, गुरुवारी शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांनी सायंकाळी 6 वाजल्यापासुनच ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. विद्युत रोषणाई, कंदील, फुगे लावून हॉटेल्स सजविण्यात आली होती. त्याचबरोबर दोन टेबलामध्ये अंतर ठेवून सुरक्षेचे नियमही पाळले. मात्र नेहमीच्या तुलनेत 40 टक्के ग्राहक हॉटेल्समध्ये न आल्याने हॉटेल्स व्यावसायिकांचा हिरमोड़ झाला. तर दुसरीकडे तरुण-तरुणीचे ग्रुप, काही कुटुंबे रस्त्यावर फिरत आनंद घेत होती. महात्मा गांधी रस्ता, लष्कर परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर आदी भागातही नागरीक रस्त्यावर कमी प्रमाणात आले.

पोलिसांच्या आवाहनानंतर रात्री साडे दहा वाजल्यानंतर बहुतांश हॉटेल्स बंद झाले. त्यापाठोपाठ रस्त्यावरील उरलेल्या गर्दीनेलाही ओहोटी लागली. अकरा वाजल्यानंतर बहुतांश रस्त्यावर तुरळक नागरिक दिसत होते.नागरीकांऐवजी पोलिस आणि फुगे विक्रेते यांचीच गर्दी दिसू लागली. काही ठिकाणी मनाई असतानाही टेरेसवर गर्दी झाली होती. नागरिकांनी आपापल्या घरी जाऊन सरत्या वर्षाला निरोप देत पुणेकरांनी 2021 या नव्या वर्षाचे तितक्याच आनंदात आणि उत्साहात स्वागत केले. 

Welcome 2021: दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारे पुण्यातील रस्ते पडले ओस!​

पोलिसांचा खडा पहारा
रस्त्यावर नागरीकांची गर्दी होऊ नये यासाठी गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच शहरातील मुख्य रस्ते, चौकात पोलिसांचे समूह दिसत होते. पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर बंदोबस्त करत होते. रस्त्यावर नागरीक आणि विक्रेते यांना तेथून जाण्यासाठी पोलिस बजावत होते.वाहतूक पोलिसही रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करत असल्याचे तसेच दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यावर कारवाई करत असल्याचे नाकेबंदीच्या ठिकाणी दिसुन आले.

"कोरोनामुळे आम्हीही लवकर घराबाहेर पडुन मुलीला थोडे फिरविले. गर्दीमध्ये गेलो नाहीत. पोलिसांच्या आदेशाचे फक्त आम्हीच नाही तर पुणेकरांनी पालन केले आहे."
- सोनाली आणि स्वप्निल मालुसरे, व्यावसायिक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saying goodbye to 2020 Pune citizens welcomed new year 2021 with joy and enthusiasm