भारतीय शास्त्रज्ञांना यश; उलगडले ब्रह्मांडाच्या तारूण्यातील ताऱ्यांचे रहस्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

तारा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या हायड्रोजन वायूचे वस्तुमान मोजणाऱ्या या संशोधनात बंगळूरस्थित रमण रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (आरआरआय) खगोलशास्त्रज्ञांचाही संशोधनात सहभाग आहे.

पुणे : ऐन तारुण्यातील ब्रह्माडामध्ये ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग काय होता? तो कमी केव्हा झाला? त्याचे कारण काय असावे? अशा प्रश्‍नाचा वेध घेण्यास भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. नारायणगाव जवळील अद्ययावत जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (युजीएमआरटी) साहाय्याने, आठ अब्ज प्रकाशवर्षे दूरवरच्या दीर्घिकांमधील अणू हायड्रोजनचे वस्तुमान मोजण्यात राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांना यश आले आहे. 

Breaking : कोरोना सर्व्हेचं काम स्थगित; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय!​

तारा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या हायड्रोजन वायूचे वस्तुमान मोजणाऱ्या या संशोधनात बंगळूरस्थित रमण रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (आरआरआय) खगोलशास्त्रज्ञांचाही संशोधनात सहभाग आहे. 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकात गुरुवारी (ता.15) हा शोधनिबंध प्रकाशित होत आहे. ब्रह्मांडाचे हे अतिपूर्व युग आहे की, ज्यामधील दीर्घिकांमधील अणू वायूच्या वस्तुमानाचे मोजमाप आता उपलब्ध झाले आहे. संशोधक विद्यार्थी आदित्य चौधरी, प्रा. के. एस. द्वारकानाथ, प्रा. जयराम चेंगलूर, प्रा. निस्सीम काणेकर आणि आरआरआयचे प्रा. शिव सेठी यांनी हे संशोधन केले.

पुणेकरांनो सावध राहा; डिसेंबर-जानेवारीत येणार कोरोनाची दुसरी लाट!​

संशोधनाची पार्श्‍वभूमी : 
- विश्वातील दीर्घिका (आकाशगंगा) या बहुतांशी वायू आणि तारेपासून बनतात. 
- दीर्घिकांना समजून घेण्यासाठी वायू आणि तारे यांचे वेळोवेळी बदलणारे प्रमाण जाणून घेणे आवश्‍यक 
- ताऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अंदाजे आठ ते दहा अब्ज वर्षापूर्वी अति उच्च प्रमाणात होती, हळूहळूतदी ती मंदावत आहे. 
- प्रक्रिया मंदावण्याचे कारण अद्याप अज्ञात. कारण, ब्रह्मांडाच्या सुरवातीच्या काळात दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती करणाऱ्या अणु हायड्रोजनचे प्रमाण माहीत नव्हते.

असे झाले संशोधन :
- हायड्रोजन अणूतील इलेक्‍ट्रॉन ट्रांझीशनमुळे 21 सेंटीमीटर तरंगलांबीच्या विद्यूतचुंबकीय लहरी उत्सर्जित होतात 
- दृश्‍य (ऑप्टिकल) दुर्बिणीद्वारे पूर्वी शोधलेल्या जवळपास आठ हजार दीर्घिकांची रेडिओ सिग्नल एकत्र करण्यासाठी 'स्टॅकिंग'नावाची पद्धत वापरली. 
- अद्ययावत जीएमआरटीच्या सहाय्याने दीर्घिकांतील सरासरी हायड्रोजन वायूचे वस्तुमान मोजण्यात आले.

केशरी कार्डधारकांचं धान्य दुकानांपर्यंत पोचलंच नाही; ३ महिन्यांपासून धान्याची प्रतीक्षा!

संशोधनाचे महत्त्व :
- प्रथमच 8 अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांमधील अणु हायड्रोजनचे वस्तुमान मोजण्यात आले. 
- त्या दीर्घिकांमधील ताऱ्यांच्या निर्मितीचा दर लक्षात घेता, हायड्रोजन अणुवायू अवघ्या एक किंवा दोन अब्ज वर्षांत ताऱ्यांच्या निर्मितीसाठी पूर्णपणे वापरला गेला. 
- दीर्घिकांना जर अधिक वायू मिळवू शकली नाही, तर ताऱ्यांची निर्मिती प्रक्रिया कमी कमी होऊन शेवटी ती थांबेल. 
- तारे निर्मितीच्या प्रक्रियेमधील घट ही अणू हायड्रोजन वायू संपल्यामुळे होते हे स्पष्ट केले जाऊ शकते. 

अद्ययावत जीएमआरटी मधील नवीन वाइड बॅंड रिसीव्हर आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स तंत्रप्रणाली ने आम्हाला"स्टॅकिंग'पद्धतीच्या विश्‍लेषणामध्ये दहा पट अधिक दीर्घिका वापरण्याची संधी मिळाली.त्यामुळेच कमकुवत 21 सेमी सिग्नल निरीक्षणासाठी पुरेशी संवेदनशीलताही मिळाली. 
- डॉ. जयराम चेंगलूर, अधिष्ठाता, एनसीआरए-टीआयएफआर 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientists at NCRA have succeeded in measuring mass of atomic hydrogen in galaxies with help of UGMRT