esakal | ज्येष्ठ नागरिकांची लशीसाठी वणवण

बोलून बातमी शोधा

senior citizen
ज्येष्ठ नागरिकांची लशीसाठी वणवण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या चार दिवसांपासून लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी लायगुडे रुग्णालय, वडगावमधील केंद्र, कुदळे बाग केंद्र, गाडगीळ दवाखाना अशा ठिकाणी फिरत आहोत. आज सकाळी सातला रांगेत लागलो पण तरीही आमचा नंबर आला नाही. दुसऱ्या ठिकाणी गेलो, तेथे फक्त ८० लस होत्या. आमचा ८९वा नंबर होता. कोणत्या केंद्रावर किती लस आहे, संपली तर कधी उपलब्ध होणार, हे काहीच कळत नाही. दुसऱ्या डोससाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. आता उद्या पहाटे पाचलाच येऊन थांबलो तरच लस मिळेल, ही हतबलता होती श्रीकांत पाटील आणि सुषमा पाटील या दांपत्याची. अशीच अवस्था आज (ता. २६) पुण्यातील सर्वच केंद्रांवर होती.

img

vaccination on 26/4/2021

हेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू

शासनाकडून महापालिकेला तीन दिवसांनी ३८ हजार लसीचे डोस मिळाले. त्यामुळे पहाटेपासून ११० शासकीय लसीकरण केंद्रांवर २००-३०० पेक्षा जास्त ४५ वर्षांपुढील नागरिक, तसेच ज्येष्ठ स्त्री-पुरुषांच्या रांगा लागलेल्या होत्या. पालिकेने काही केंद्रांना ५०, काहींना १०० तर काही ठिकाणी १५० डोस दिले होते. जेवढे डोस उपलब्ध, तेवढ्यांना टोकन देऊन उर्वरित नागरिकांना दुसऱ्या केंद्रावर जाण्यास सांगण्यात आले. ज्यांनी आॅनलाइन नोंदणी करून ठरलेल्या वेळेत केंद्रावर येऊनही लस न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले.

विजय शिरोडे म्हणाले, ‘‘मी शुक्रवारी आॅनलाइन बुकिंग केले, पण अजूनपर्यंत मला लस मिळाली नाही. आज लसीकरण करायचे होते, म्हणून सुटी टाकली होती. सिंहगड रस्त्यावरील सर्व केंद्रांवर जाऊन आलो पण लस मिळाली नाही.’’

कोथरूड येथील ७० वर्षाचे आजोबा म्हणाले, ‘‘गेल्या १० दिवसांपासून मी लस कुठे मिळते का हे शोधत आहे. आज सकळी बिंदुमाधव ठाकरे रुग्णालय येथे गेलो असता ३३० वा नंबर होता, तेथे लस मिळणार नाही म्हणून नंतर इतर तीन दवाखाने फिरलो पण लस मिळाली नाही.’’

हेही वाचा: थोडा रुसवा, थोडा फुगवा संसाराचा भन्नाट गोडवा!

उत्तरे काय देणार ?

एका केंद्रावरील एक डॉक्टर म्हणाल्या, ‘‘या केंद्रावर आम्ही दिवसाला एक हजारपेक्षा जास्त जणांचे लसीकरण केले आहे पण आता ५०-१०० डोस उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वांना लस देता येणार नाही. लस संपल्यावर त्या पुन्हा कधी येणार, किती येणार हे देखील आम्हाला माहिती नसते. अशीच स्थिती संपूर्ण शहरात असल्याने नागरिकांना काय उत्तरे द्यायची हा प्रश्‍न पडत आहे.’’

पुण्यात सोमवारी २४७०२ जणांचे लसीकरण

लसीकरण - पहिला डोस - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी ः २५९ - ५७६

फ्रंट लाईन कर्मचारी ः १११८ - ५७५

ज्येष्ठ नागरिक ः ३०३७ - १००७२

४५ ते ५९ वयोगट ः ६२६८ - २७९७

हेही वाचा: विनावापर ऑक्सिजन सिलिंडर गोदामात जमा करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

चौदा हजार लस शिल्लक

रविवारी ३८ हजार लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यातील २४ हजार लस एका दिवसात संपल्या. आता १४ हजार लस शिल्लक आहेत. त्याचा वापर उद्या (मंगळवारी) होईल. राज्य शासनाकडून मंगळवारी लस उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहीम पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

''शासनाकडून मिळालेल्या लसीचे रविवारी दुपारपासून वाटप सुरू केले होते. मुख्य केंद्रातून प्रत्येक विभागीय केंद्रावर लस पाठवली जाते. तेथील प्रमुख कोणत्या केंद्राला किती लस द्यायचे, हे ठरवून लस वाटप करतात. शासनाकडे जास्तीच्या लस मागितल्या आहेत, पण अजून प्राप्त झालेल्या नाहीत.''

- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण वितरण अधिकारी.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी