esakal | अल्पवयीन मुलीवर ६ जणांकडून दोन अडीच महिने लैंगिक अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

अल्पवयीन मुलीवर ६ जणांकडून दोन अडीच महिने लैंगिक अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील एका गावातील सातवीत शिकणाऱ्या १२ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने बलात्कार व लैंगिक अत्याचार केल्याची घटना मे ते ऑगस्ट महिन्यादरम्यान घडली. यातील तीन संशयित आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली असून त्यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा: स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा मैत्रिणीने केला खून

खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळा बंद असल्याने घरी होती. दरम्यान तिच्या मोठ्या बहिणीच्या बाळंतपणानंतर झालेल्या बाळास डोक्याचा आजार झाल्याने रूग्णालयात ठेवावे लागले. म्हणून बहिण व बाळासोबत, मुलीच्या आईसही एक ते दीड महिना रूग्णालयात थांबावे लागले. त्या काळात मुलगी धुणे धुण्यासाठी नदीवर जायची. तेव्हा संशयित आरोपींपैकी एकाने धमकावून डीजेच्या गाडीत नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर एके दिवशी दुसऱ्याने धमकावून त्याच ठिकाणी बलात्कार केला. इतरांपैकी एकेकाने त्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणी तिला एकटीस गाठून २७ मे ते १५ ऑगस्टच्या दरम्यान बळजबरीने बलात्कार केला. तिला व घरच्यांना मारण्याची धमकी देऊन हे कृत्य करण्यात आले.

हेही वाचा: Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेसची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर

हा प्रकार मुलीच्या नातेवाईक महिलेस समजल्यावर तिने मुलीच्या आईस सांगितला. आईने मुलीस विश्वासात घेऊन विचारल्यावर मुलीने हकीकत सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी सोन्या घुमटकर, आकाश शिंदे, परेश ढमाले, अवधूत कानसे, साईनाथ मुळूक, सूरज रोडे ( सर्व रा. चास, ता. खेड ) यांच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यापैकी तीन संशयित आरोपींना, पोलिसांनी अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत. या घटनेचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहेत.

loading image
go to top