शरजिल उस्मानीवर देशद्रोहाच्या कलमानुसार कारवाई करा; BJPची पोलिस आयुक्तांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोतदार देखील आरोपी आहे.​

पुणे : एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर देशद्रोहाचे कलम लावून त्याला त्वरित अटक करावी. तसेच परिषदेच्या आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीकडून पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

उस्मानी यांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत ॲड. प्रदीप गावडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार उस्मानीवर मंगळवारी (ता. २) स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिषदेत केलेल्या भाषणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत उस्मानी आणि परिषदेच्या आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर आदी उपस्थित होते.

शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​

हर्षाली पोतदार यांच्या निमंत्रणावर उस्मानी परिषदेत सहभागी झाला होता. ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या परिषदेच्या आयोजनातही पोतदार सक्रिय होती. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोतदार देखील आरोपी आहे. तर उस्मानीवर यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे, असे भाजपाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

देशातील सर्वांत युवा महिला पायलट; काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश

या आहेत मागण्या :
- उस्मानीला त्वरित अटक करून त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
- या प्रकरणी दाखल गुन्ह्यात देशद्रोहाचे कलम वाढवावे.
- उस्मानीला निमंत्रित करणा-या आयोजकांवरही कठोर कारवाई करावी.
- संशयास्पद पार्श्‍वभूमी असतानाही उस्मानीला बोलाविण्यामागे काय उद्देश होता?
- या कार्यक्रमागे काही व्यापक कट होता का? याबाबत सखोल तपास करावा.

Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ

शरजील उस्मानीसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीने राज्यात येऊन हिंदूचा अवमान करणारी वक्तव्ये केल्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. शासनाने तातडीने पावले उचलून उस्मानी आणि एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल.
- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजपा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharjeel Usmani should be arrest on charge of treason for provocative statement about Hindu at Elgar Parishad demand by BJP