esakal | श्रेय घेण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादीची वाघोलीत फ्लेक्स बाजी

बोलून बातमी शोधा

Shiv Sena and NCP are using flex in Wagholi to get credit of covid care center
श्रेय घेण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादीची वाघोलीत फ्लेक्स बाजी
sakal_logo
By
शरयू काकडे

वाघोली : वाघोलीत सध्या कोविड सेंटर व लसीकरणासाठी ज्या सुविधा पुरविण्याची गरज आहे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र, श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये जोरदार फ्लेक्सबाजी सुरू आहे. लस घेण्यासाठी तासन् तास बसण्याची वेळ नागरिकांवर येते. फ्लेक्सबाजी पेक्षा सुविधा पुरविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे नागरिक सांगतात. वाघोलीत 250 बेड चे बीजेएस कोवीड केअर सेंटर आहे. येथे सध्या किमान 4 वैद्यकीय अधिकारी व 4 नर्सेसची गरज आहे. हा स्टाफ मिळावा यासाठी जिल्हा परिषद स्तरावर गांभिर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. येथील सेन्टर मध्ये 200 पेक्षा अधिक रुग्ण दाखल असतात. रुग्ण गंभीर होऊन त्याला अन्यत्र हलविण्याची वेळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर येते.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या केंद्राला भेट दिल्यानंतर 10 ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी फोन वरून चर्चा केली होती. ग्रामपंचयातीनेही त्यासाठी मदत करण्याची तयारी दाखविली होती. मात्र हा विषय चर्चे पुरताच मर्यादित राहिला. पुढे कोणतीही हालचाल झाली नाही. येथील सेन्टर मध्ये 200 पेक्षा अधिक रुग्ण असल्याने डॉक्टर व नर्सेस ची गरज आहे. मात्र उपलब्ध स्टाफवरच हे सेन्टर चालवावे लागत आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी वाघोलीत आतापर्यंत 5 जण पकडले; नागरिकांचा तीव्र संताप

शिक्षकांची दांडी

येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना सर्व सुविधा वेळेवर मिळतात का? हे बघण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यांना विभागून ड्युटी देण्यात आली आहे. मात्र यातील एकही शिक्षक ड्युटीवर हजर झाले नाही.

लसीकरणासाठी तासन् तास

येथील बीजेएस लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस घेण्यासाठी तासंतास बसावे लागते. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी खूप वेळ लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांनाच हे काम करावे लागते. लस देण्यासाठी अधिक नर्सेस ची गरज आहे. कमी स्टाफ मुळे नागरिकांना लसीकरणासाठी तासन् तास बसावे लागते. नोंदणीसाठी स्टाफ मिळाल्यास व लसीकरणासाठी अधिक नर्सेस मिळाल्यास नागरिकांना जास्त वेळ बसावे लागणार नाही.

डॉक्टर असोसिएशनकडून स्टाफ नाही

प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत वाघोली डॉक्टर असोसिएशने लसीकरणासाठी स्टाफ देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र त्यांनीही आश्वासनाची पूर्तता केली नाही.

हेही वाचा: 'ऑक्सिजनची पातळी होती कमी पण मी जिंकलो'

सूक्ष्म प्लॅनिंगची गरज

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके आरोग्य यंत्रणेकडून दररोज जास्तीत जास्त लस कशी मिळेल व ती नागरिकांपर्यंत कशी पोहचेल यासाठी प्रयत्नशील असतात. ते दररोज सकाळी आठ वाजल्यापासून केंद्रावर जाऊन बसतात. येथील केंद्रावर त्यांनी नागरिकांसाठी पाणी व चहा ची व्यवस्था केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी तीन गावात लसीकरण केंद्रही सुरू केले आहे. अंध, दिव्यांग, आजार असलेले वृद्ध यांच्यासाठी त्यांनी सोसायटी स्थरावरही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. हे जरी होत असले तरी 1 मे पासून 18 वयापेक्षा जास्त असणाऱ्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. त्यावेळी अधिक गोंधळ असेल. हा होऊ नये यासाठी त्यांना मायक्रो प्लांनिंग करावे लागणार आहे.

एकत्रित येऊन काम करण्याची गरज

आमदार अशोक पवार हे ही कोवीड व लसीकरण सेंटरला वारंवार भेट देऊन आढावा घेतात. मात्र, त्यातून काही प्रश्न सुटत नाही. त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन प्लांनिंग केल्यास लसीकरण झपाट्याने होऊन नागरिकांनाही दिलासा मिळेल. तसेच कोविड सेंटर मधील रुग्णांनाही सुविधा मिळतील.

ग्रामपंचायतीची टाळाटाळ

वाघोली ग्रामपंचायतीकडे कर्मचाऱ्यांची संख्या भरपूर आहे.लसीकरण केंद्रावर यातील काही कर्मचारी मदत करू शकतील. मात्र त्यांना मदतीसाठी पाठविले जात नाही. यालाही राजकारणाचीच किनार असल्याचे बोलले जाते.