पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' ठिकाणी मिळणार शिवभोजन; 26 जानेवारीपासून प्रारंभ!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

दररोज नोंद घेण्यासाठी महाअन्नपूर्णा मोबाईल ऍप शासनाने विकसित केले आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांचे नाव नोंदवून त्याचा फोटो अपलोड केला जाणार आहे.

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून एकूण 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू होणार आहेत. पुणे शहरातील सात केंद्रांमधून एक हजार नागरिकांना, तर पिंपरी चिंचवडमधील चार केंद्रांमधून 500 व्यक्तींना दररोज जेवण दिले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या 26 जानेवारीपासून या दोन्ही शहरांत राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुवात होणार आहे. शिवभोजन केंद्रामध्ये गर्दी झाल्यास नियंत्रणाकरिता आवश्‍यकतेप्रमाणे पोलिस संरक्षण पुरविण्यात येणार आहे. 

राज्य शासनाने गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना अवघ्या 10 रुपयांत जेवण मिळणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या दोन्ही शहरातील 11 केंद्रांची निवड केली आहे. या केंद्रचालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- 'क्रेडीट सिस्टीम'च्या त्रुटींमुळे रखडले निकाल

पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर ही ठिकाणी निश्‍चित करण्यात आली असून, प्रामुख्याने शासकीय इमारती, बसस्थानक, रुग्णालये या ठिकाणांचा विचार करण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण मिळणार आहे. 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅम एक वाटी भाजी, 100 ग्रॅमचे 1 वाटी वरण व 150 ग्रॅम भात या थाळीत समाविष्ट असणार आहे. 

एका लाभार्थ्याला एकावेळी एकदाच भोजन दिले जाणार आहे. दररोज नोंद घेण्यासाठी महाअन्नपूर्णा मोबाईल ऍप शासनाने विकसित केले आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांचे नाव नोंदवून त्याचा फोटो अपलोड केला जाणार आहे. दररोज किती थाळ्यांचा खप झाला, याची माहिती शासनास उपलब्ध होणार आहे. 

- पुणे : 'या' सरकारी कार्यालयात वेळेत हजर न राहिल्यास होणार कारवाई

या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल. शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल, त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सवलतीच्या दरात जेवणास मनाई आहे. त्याचबरोबर अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. 

- कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर कॅंडी क्रश; प्रभारी सहकार आयुक्त निलंबित

शिवभोजन केंद्र 

हडपसर गाडीतळ येथे शिवसमर्थ भोजनालय, कात्रज बसस्थानक येथे हॉटेल कात्रज कॉर्नर, स्वारगेट येथे बसस्थानक कॅन्टीन, मार्केट यार्ड येथे हॉटेल समाधान गाळा नंबर 11, शिवाजीनगर येथे कौटुंबिक न्यायालय कॅन्टीन, पुणे महापालिका येथे हॉटेल निशिगंधा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॅन्टीन, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर बसस्थानक पिंपरी, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे कॅन्टीन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivbhojan started from 26th January in Pimpri Chinchwad and Pune