हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठीचा महत्त्वपूर्ण करार मार्गी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे संकल्पना/रचना करा, बांधा, वित्तपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा (डीबीएफओटी) या तत्त्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येणारा पुणे मेट्रो मार्गिका (हिंजवडी ते शिवाजीनगर) हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने ट्रील अर्बन ट्रान्स्पोर्ट (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडची उपकंपनी) आणि सिमेन्स प्रोजेक्‍ट व्हेन्चर्स जीएमबीएच (सिमेन्स फायनान्शियल सर्व्हिसेसची उपकंपनी) यांच्या संयुक्त भागीदारीसोबत प्रकल्पाच्या सवलत करारनाम्यावर शनिवारी (ता.22) स्वाक्षऱ्या केल्या. 

सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे संकल्पना/रचना करा, बांधा, वित्तपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा (डीबीएफओटी) या तत्त्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. याचा कालावधी 35 वर्षांचा असणार आहे. प्राधिकरणामार्फत महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी राज्य सरकार, पीएमआरडीए; तसेच टाटा व सीमेन्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, प्राधिकरणाने टाटा सिमेन्स हा सवलतदार व इतर शासकीय संस्था; तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासोबत समन्वय साधून पर्यायी मार्गाची आखणी केली आहे. मेट्रोच्या कारडेपो आणि सेवा रस्त्यांसाठी मुळशी तालुक्‍यातील माण येथे भूसंपादन सुरू केले आहे. 

काय फायदे होणार? 
- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 23.3 किमी 
- अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार करता येणार 
- पुणेकरांना सक्षम वाहतूक यंत्रणा उपलब्ध होणार 
- सुविधाजनक प्रवास आणि वेळेची बचत होणार 
- रस्त्यावरील खासगी वाहने कमी होणार 
- कार्बनउत्सर्जन व प्रदूषण कमी होण्यास मदत 
- प्रकल्पाचे बांधकाम साडेतीन वर्षांत करणार 
- बांधकामावेळी अडथळे येऊ नयेत म्हणून उपाययोजना 

- अपना टाईम आ गया; 'गली बॉय' निघाला ऑस्करला!

- यूपीएससीत मराठी टक्का वाढविण्यासाठी पुणे विद्यापीठात विशेष प्रशिक्षण

- पुणे : मोदींचे वर्गमित्र हरीभाई शहा यांचा आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Significant deal for the Hinjewadi to Shivajinagar Metro