'सिमरन' वेधतंय ग्राहकांचं लक्ष; मागणीमुळे दरामध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तराखंड भागात याचे उत्पादन घेतले जाते.

मार्केट यार्ड (पुणे) : चवीला गोड असलेल्या "सिमरन" फळाचा हंगाम मार्केट यार्डातील फळबाजारात बहरला आहे. सिमरन फळ ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून या फळाची आवक होत आहे. सध्या दररोज बारा ते चौदा किलोच्या ८० ते १०० पेट्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. तर रविवारी याची जास्त आवक होते. घाऊक बाजारात त्याच्या एका पेटीला दर्जानुसार १५०० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. या फळाचा हंगाम ऑक्टोंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!​

दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. या फळाला शहरासह उपनगरांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते दहा टक्क्यांनी दर जास्त आहेत. विदेशात या फळाला "परसिमन" असे म्हणतात. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या फळांचा दर्जा चांगला असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी सलीम बागवान यांनी दिली. 

चीन, कोरिया, जपान, ब्राझील, यूएसए, स्पेन, इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया या देशात या फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तर भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तराखंड भागात याचे उत्पादन घेतले जाते. हे फळ खूप गोड आणि उत्कृष्ट स्वाद तसेच आरोग्यास चांगले असल्याने याला बाजारात चांगली मागणी असते.

अॅड. सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा हार; छावा संघटनेचं पुण्यात आंदोलन​

भारतात अनेक ठिकाणी लग्नकार्यासह, विविध कार्यक्रमात याचा "जपानी फळ" म्हणून खाण्यासाठी वापर होतो. गोड आणि उत्कृष्ट स्वादामुळे अनेक लोक खातात.  या फळांमध्ये कॅलरी आणि चरबी कमी असतात. तसेच व्हिटॅमिन ‘सी’ देखील असल्यामुळे मागणी चांगली आहे.
- सलीम बागवान, व्यापारी, मार्केट यार्ड.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simran fruit has started arriving in Pune market yard