बारामतीकरांनो, जरा जपून...कोरोनाने ठोकलाय षटकार...

मिलिंद संगई
Saturday, 4 July 2020

बारामतीने कोरोनाची साखळी तोडण्यात यश प्राप्त केले होते. आज अचानकच शहराच्या मध्यवर्ती भागातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे.

बारामती (पुणे) : बारामती शहरातील अशोकनगरमधील एका वकिलांच्या पत्नीसह शहरातील एका नगरसेवकाचा मुलगा व तांबेनगरमधील एक रहिवासी आज कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच, कोरोनाग्रस्त झालेल्या आयटी अभियंत्याचे तालुक्यातील काटेवाडी येथील दोन मित्रही आज पॉझिटीव्ह निघाले, तर सावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे शाखेत कार्यरत एक कर्मचारीही पॉझिटीव्ह निघाला. बारामती तालुक्यात एकूण सहा जण आज कोरोनाबाधित आढळले आहेत. 

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

बारामती शहर व तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा अचानक सहाने वाढला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. आज एकाच दिवशी सहा कोरोनाबाधित निघाल्याने बारामतीतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतक्या दिवस बारामतीने कोरोनाची साखळी तोडण्यात यश प्राप्त केले होते. आज अचानकच शहराच्या मध्यवर्ती भागातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे.

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ
 
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बैठक घेतली. शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला तातडीने कोरोना केअर सेंटर करून येथील सर्व कामकाज एमआयडीसीतील महिला रुग्णालयातून करण्याचे निर्देश पवार यांनी आरोग्य विभागास दिले आहे. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, पण ज्यांना तीव्र लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात ठेवले जाणार आहे. त्या दृष्टीने आता आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. 

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

आज कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्यानंतर पुन्हा काही बाबतीत निर्बंध कडक करायचे का या वरही चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र या बाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर आणि सॅनेटायझरचा वापर करावा, अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील बैठकीत केले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून साखळी मोडण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six corona patients were found in a single day in Baramati taluka