स्मार्ट चोरी करत 'त्याने' बॅंकेतून काढले ३३ हजार रुपये; मग पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

सोमवारी पहाटे पावणे चार वाजता तोंडाला काळा मास्क लावून एक चोरटा वृद्धाच्या सदनिकेमध्ये शिरला. त्याने वृद्धाच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास काही आढळले नाही.

पुणे : सदाशिव पेठेतील एका 82 वर्षीय वृद्धाच्या घरी सोमवारी (ता.14) पहाटे पावणे चार वाजता चोरटा शिरला. त्याने घरात शोध घेतला, मात्र त्याच्या हाती काहीच लागले नाही. अखेर त्या 'हुशार' चोरट्याने वृद्धाचा मोबाईल आणि त्यांचे बॅंकेचे धनादेश चोरुन नेले, त्यापैकी एक धनादेश बॅंकेत वटवून 33 हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा प्रकार घडला. दरम्यान, पोलिसांनीही तितक्‍याच हुशारीने त्या पोलिसाला पकडून बेड्या ठोकल्या. 

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना पाठवलं पत्र; अभ्यासकांनी केल्या 'या' मागण्या​

विनायक अशोक दारवटकर (वय 39, रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य काटे (वय 29, रा. सदाशिव पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सदाशिव पेठेतील नारद मंदिराजवळील एका सोसायटीतील सदनिकेमध्ये 82 वृद्ध व्यक्ती राहतात. संबंधीत सदनिकेच्या जवळच वृद्ध व्यक्तीचे नातेवाईक असलेले फिर्यादीही राहतात. वृद्ध व्यक्ती आजारी असल्याने त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असतो.

'जम्बो'ने कामगिरी सुधारली; एकाच दिवशी २८ रुग्णांना दिला डिस्चार्ज!​

दरम्यान, सोमवारी पहाटे पावणे चार वाजता तोंडाला काळा मास्क लावून एक चोरटा वृद्धाच्या सदनिकेमध्ये शिरला. त्याने वृद्धाच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास काही आढळले नाही. त्यामुळे त्याने वृद्धाचा 500 रुपये किंमतीचा मोबाईल आणि त्यांच्याकडील दोन वेगवेगळ्या बॅंकांचे धनादेश चोरून तेथून पळ काढला. दरम्यान, हा सर्व प्रकार फिर्यादी यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

चोरट्याने वृद्धाची स्वाक्षरी असणाऱ्या धनादेशाचा वापर करुन बॅंकेतून 33 हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यास सुरूवात केली.

पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण!​

पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक विश्‍लेषण करुन तपास केला जात होता. त्याचवेळी चोरीचा हा प्रकार विनायक दारवटकर याने केला असल्याची खबर पोलिस कर्मचारी समीर माळवदकर आणि बंटी कांबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दारवटकर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बॅंकेचे कोरे धनादेश, धनादेश वटवून बॅंकेतून काढलेली 33 हजार रुपयांची रक्कम जप्त केली. दरम्यान, दारवटकरने नववीपर्यंत शिक्षण घेतले असल्याची माहिती पुढे आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smart thief submit check in bank and withdrew Rs 33000