esakal | someshwarnagar | राष्ट्रवादीने लुटलं मतांचं सोनं
sakal

बोलून बातमी शोधा

सोमेश्‍वर कारखान्याच्या निवडणुक

सोमेश्वरनगर : राष्ट्रवादीने लुटलं मतांचं सोनं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीतील एकूण वीस लढतीपैकी १७ जागांवर राष्ट्रवादी प्रणीत सोमेश्वर विकास पॅनेल १६ हजारांच्या आघाडीने पुढे खणखणीत विजय मिळवत भाजप प्रणित सोमेश्वर परिवर्तन पॅनेलला चारीमुंड्या चीत केले आहे.

राष्ट्रवादीप्रणित अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर विकास पॅनेल व दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित सोमेश्वर परिवर्तन पॅनेल यांचे प्रत्येकी वीस उमेदवार रिंगणात उतरले होते. तर सहा अपक्ष होते. राष्ट्रवादीचे ‘ब’ वर्ग प्रतिनिधी संग्राम सोरटे बिनविरोध निवडून आले. वीस जागांसाठीच्या निवडणुकीत २५ हजार ६७७ मतदारांपैकी २० हजार ५३३ मतदान झाले होते. यामध्ये विकास पॅनेलने सतरा ते अठरा हजार; तर परिवर्तनने दीड ते तीन हजार मते मिळविली आहेत. पहिल्या निकालात विकास पॅनेलचे उमेदवार अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे यांनी परिवर्तनचे बाबूराव गडदरे, शंकर दडस, श्रीरंग साळुंखे यांचा; तर मुरूम-वाल्हे गटातून पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, ऋषीकेश गायकवाड यांनी माजी संचालक पी. के. जगताप, संपत भोसले, हनुमंत शेंडकर यांचा दारुण पराभव केला.

हेही वाचा: Pune Crime : गुगल पे करताना झालेली मैत्री तरुणीला पडली महागात

होळ-मोरगाव गटात किसन तांबे, शिवाजीराजे निंबाळकर यांनी अठरा हजार मतांचा उंबरठा ओलांडला. त्यांच्यासह आनंदकुमार होळकर यांनी खलिल काझी, विठ्ठल पिसाळ, गणपत होळकर यांना दोन हजारांवरच अडविले. कोऱ्हाळे-सुपे या चौथ्या गटात सुनील भगत यांनी १८ हजार १४४ मते मिळविली, तर प्रतिस्पर्धी पराभूत दिलीप खैरे यांनी त्यांच्या पॅनेलमधून सर्वाधिक २९३९ मते मिळविली. या गटातून राष्ट्रवादीच्या हरिभाऊ भोंडवे, रणजित मोरे यांनीही रामदास गुळमे, भगवान माळशिकारे यांची डाळ शिजू दिली नाही. अपक्षांची मते नगण्य राहिली.

गट क्रमांक पाचमधील विश्वास जगताप यांनी सर्व गटातून सर्वाधिक १९ हजार ८१६ मतांचा उच्चांक केला. त्यांच्यासह शांताराम कापरे, बाळासाहेब कामठे यांनी बजरंग किन्हाळे, सुरेश कुदळे, अजित धुमाळ यांना अस्मान दाखविले. तर, महिला राखीवमधून प्रणिता खोमणे व कमल पवार सुजाता जेधे व बायडाबाई यांचा सरळ पराभव केला.

विकास पॅनेलचे विजयी उमेदवार

गट क्र. १- निंबुत-खंडाळा- अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे.

गट क्र. २- मुरूम-वाल्हे- पुरुषोतम जगताप, ऋषीकेश गायकवाड, राजवर्धन शिंदे.

गट क्र. ३- होळ-मोरगाव- किसन तांबे, शिवाजीराव राजेनिंबाळकर, आनंदकुमार होळकर.

गट क्र. ४- कोऱ्हाळे-सुपे- सुनील भगत, हरिभाऊ भोंडवे, रणजित मोरे.

गट क्र. ५ : मांडकी-जवळार्जुन- शांताराम कापरे, बाळासाहेब कामथे, विश्वास जगताप. महिला

राखीव गट- प्रणिता खोमणे, कमल पवार.

हेही वाचा: Pune : दसऱ्याच्या दिवशी पथ संचलन नाही, केवळ शस्त्रपूजन होणार

सहकार आणि साखरउद्योग कोण चांगला चालवू शकतो, याचं खणखणीत उत्तर सोमेश्वर कारखान्याच्या शेतकऱ्यांनी दिलं आहे. त्यांच्यावर खासगीकरणाचे आरोप करणारांची तोंडे या मताधिक्याने बंद होणार आहेत. पवारसाहेब आणि अजितदादांवरील विश्वासच या भव्यदिव्य विजयातून प्रकट झाला आहे. सोमेश्वर कारखान्याने मागील काही वर्षात विक्रमी गाळप, विक्रमी साखर उतारा आणि विक्रमी भाव दिले. त्याला प्रतिसाद देत सभासदांनी विक्रमी मताधिक्य देत अपेक्षेपेक्षाही मोठा विजय मिळवून दिला. अजितदादांच्या सूचनांप्रमाणे पॅनेलच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले, त्या प्रत्येकाचे आभार. ‘असे मताधिक्य मिळवून द्या की पुढच्याची बोबडी वळली पाहिजे,’ असे आवाहन अजितदादांनी सभासदांना केले होते. सभासदांनी तेच खरे करून दाखविले आहे. या विजयाने जबाबदारी अधिक वाढली आहे. कारखाना राज्यात अग्रभागी राहण्यासाठी आता अधिक काम करावे लागणार आहे.

- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

सोमेश्वर कारखान्याच्या परंपरागत विरोधकांनी पवारांशी युती केल्याने निवडणूक बिनविरोध होणार, ही चर्चा होती. परंतु, ऐनवेळी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सामान्य सभासदांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा आम्ही निर्णय घेतला. प्रचारास कमी वेळ मिळाला. समोर उपमुख्यमंत्री, तीन आमदार, अनेक मातब्बर व धनशक्ती एकत्र असतानाही आमच्या सामान्य शेतकऱ्यांनी लढण्याचे दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. मात्र, जनादेश मनापासून स्वीकारतो आणि विजयाबद्दल अजित पवार व त्यांची टीम व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. यापुढे विरोधक म्हणून सक्षम काम करणार. पवारांना कारखाना घेण्यास पस्तीस वर्ष लागली, ही तर आमची स्वतंत्रपणे पहिली निवडणूक होती. पण, अजितदादांसारख्या वैधानिक पदावरील नेत्यानेच, ‘एखाद्या बूथवर पक्षाला झटका दिला तर मी पण झटका देईन,’ अशी दमदाटी केली. त्यामुळे मतदार मोकळेपणाने मतदान करू शकले नाहीत.

- दिलीप खैरे, पॅनेलप्रमुख, भाजपप्रणीत सोमेश्वर परिवर्तन पॅनेल

loading image
go to top