Vidhan Sabha 2019 : पुनर्वसनासाठी कालबद्ध कार्यक्रम : सुनील कांबळे

special interviews on BJP Cantonment Candidate Sunil Kamble
special interviews on BJP Cantonment Candidate Sunil Kamble

पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंटचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी झोपडीधारकांचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असून त्यांचे जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीने कांबळे यांच्याशी साधलेला संवाद.

निवडणुकीविषयीची आपली भूमिका काय?
- बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर अभाविपमध्ये काम केले. युवक संघटनाचे काम आणि संघटनेतही चार वर्षे पूर्णवेळ काम केले. त्यातून कार्यकर्ता म्हणून घडलो. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनातून विचारसरणी पक्की होत गेली. 1997 मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून संधी मिळाली. तेव्हापासून झोपडपट्टी भागात आवश्यक सोयीसुविधा, व्यायामशाळा, रस्ते, अभ्यासिका अशी कामे केली. स्थायीचा अध्यक्ष झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प, स्मार्ट सिटी योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला.

प्रचारादरम्यान लोकांच्या प्रतिक्रियांविषयी काय सांगाल?

- केंद्र आणि राज्यात भाजप सरकारच्या नेतृत्त्वाखाली झालेला विकास जनतेसमोर आहे. कॅन्टोन्मेंटमधील जनताही ते अनुभवते आहे. बोर्ड, राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने या विकासाला आणखी गती मिळेल. अन्य पक्षातले अनेक नेते विकासाच्या मुद्द्यावरच भाजपमध्ये येत आहेत. पुण्यात आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विरोधक पराभूत मानसिकतेत आहेत. ते आणि त्यांचा पक्ष मतदारांना विकासाच्या पातळीवर काही देऊ शकत नाहीत, हे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

मतदारसंघातील सर्वांत महत्त्वाच्या समस्या कोणत्या?
- झोपडीधारकांचे पुनर्वसन ही सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. त्याबाबत आम्ही कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. बेरोजगारांना कौशल्यविकास प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण देऊन विविध महामंडळांमधून व्यवसायासाठी कर्जही उपलब्ध करून देणार आहोत.

अन्य कोणत्या समस्यांवर काम करण्याचा मानस आहे?
- कॅन्टोन्मेंट बोर्डाला आधुनिक बनविणे हे माझे उद्दिष्ट आहे. बोर्डाला निधीसाठी जीएसटीतील वाटा नियमित मिळावा यासाठी प्रयत्न करेन. नागरी वसाहतींचा एफएसआयचा प्रश्न आणि तेथे मूलभूत सुविधा हे प्रश्नही सोडवू. जुना बाजार येथे अद्ययावत व्यापारी संकूल उभारून छोट्या व्यापाऱ्यांना गाळे देण्यात येतील.

कॅन्टोन्मेंटमधील विद्यार्थ्यांसाठी काय योजना आहे?
- कॅन्टोन्मेंटच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व अन्य सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. येथील शाळा आणि शिक्षण जागतिक दर्जाचे होईल याकडे विशेष लक्ष देणार आहे.

मजूर, गरीबांच्या प्रश्नाबाबत काय विचार आहे
- हमाल, मजूर, रिक्षाचालक यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना हमाल महामंडळ, रिक्षा महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com