शिक्षकांच्या तपासणीवरच शाळा सुरु होणे अवलंबून

School
School

बारामती - राज्य शासनाने सोमवारपासून (ता. 23) नववी ते बारावीच्या वर्गांना परवानगी दिली असली तरी नियमावलीचा विचार करता सोमवारपासून लगेचच शाळा सुरु करणे अवघड असल्याचे शाळाचालकांचे मत आहे. मार्च पासून बंद असलेल्या शाळांची घंटा सोमवारपासून वाजेल, अशी अपेक्षा होती मात्र अडथळ्यांची शर्यत पार करतच सावधगिरी बाळगूनच शाळाचालकांना ही कसरत पार पाडावी लागणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य शासनाने 10 नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून नववी ते बारावीच्या विदयार्थ्यांची शाळा सुरु करण्यास काही अटींवर मान्यता दिली आहे. या मध्ये शिकविणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे, ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने तर शहरी भागात नगरपालिकेने प्रत्येक शाळेचे निर्जंतुकीकरण करुन घ्यायचे व प्रत्येक पालकाचे संमतीपत्रक भरुन घेतल्यावरच संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश द्यायचा अशा तीन अटींची पूर्तता करणे प्रत्येक शाळेवर बंधनकारक आहे.

जे पालक संमतीपत्रक भरुन देणार नाहीत, त्यांच्या मुलांनी शाळेत उपस्थित राहण्याबाबत जबरदस्ती करायची नाही, त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहिल, याची काळजी घ्यायची आहे. अर्थात पालकांचे प्रबोधन करुन मुलांना त्यांनी शाळेत पाठविण्याबाबत शाळाचालक प्रयत्न करु शकतात. ग्रामशिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन वातावरणनिर्मिती करुन जे पालक संमतीपत्रक देणार नाहीत, त्यांना यात सहभागी होण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान शासकीय मान्यताप्राप्त शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या आरटीपीसीआर तपासण्या विनामूल्य केल्या जाणार आहेत मात्र ज्यांना शासकीय मान्यता नाही त्यांनी शालेय स्तरावर खाजगी प्रयोगशाळेतून ही तपासणी करुन घ्यायची आहे. शाला व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ व संबंधित शालेय प्रशासन यांना हा तपासणीचा खर्च करावा लागणार आहे. 

शाळा वेळेत सुरु होणे अवघड....
एकट्या बारामती तालुक्यात नववी ते बारावीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या 1305 इतकी आहे. दोन दिवसात इतक्या तपासण्या शक्य नसल्याने ज्या शाळातील शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण होणार नाहीत, त्या शाळा सुरु करता येणे अवघड आहे. तपासणीचा अहवाल येईपर्यंत शाळा सुरु करता येणार नाहीत. 

शासननिर्देशानुसार कामकाज होईल...
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेतली. या दरम्यान दररोज जिल्ह्यात  किमान 2500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची आरटीपीसीआर टेस्ट करुन घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिका-यांना दिल्या आहे. – संजय जाधव, गटशिक्षणाधिकारी, बारामती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com