
पुणे - ""शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक वर्गाची आणि वर्गातील आसन व्यवस्थेची काटेकोर तपासणी महापालिकेतर्फे होणार आहे. या निकषांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या शाळांचीच घंटा वाजेल, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाच्या संकटामुळे पुणे शहरातील शाळा बंद होत्या; पण आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 4 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या महिनाभरापासून पुण्यात शाळा सुरू करण्याची अनेकदा चर्चा झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पालकांचीही मानसिक तयारी झालेली आहे. शासन व शाळेकडून पालकांना सुरक्षेबाबत विश्वास दिला गेल्यास शाळेतील विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी वाहतूक सुरू होईल, या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. पण बसमधून किंवा व्हॅनमधून किती विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार आहे, याबाबत परिवहन विभाग व शिक्षण विभागाने निर्णय घेणे आवश्यक आहे.
शाळा सुरू होण्याच्या तयारीबाबत विचारले असता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप म्हणाले, ""ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यानंतर फारशा अडचणी आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण प्रमुखांशी काय काळजी घ्यावी, यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांनी स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आसन व्यवस्था, सॅनिटायझर या नियमांचे शाळांकडून पालन झाले आह का, याची तपासणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी व सहायक शिक्षण प्रमुख प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन करणार आहेत. सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या तरच शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाईल.''
माझी मुलगी दहावीत शिकत असून, तिचे ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी त्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी प्रत्यक्षात शाळा सुरू होणे गरजेचे असल्याने मी तिला शाळेत पाठविण्यासाठी तयार आहे. संमतिपत्र देखील देऊ; पण मुले शाळेत गेल्यानंतर ते सुरक्षित राहतील का, मुलांनी मास्क घातला आहे ना, ते एकत्र येणार नाहीत ना, सोशल डिस्टन्स कायम असेल याबाबत आम्हाला शाळांकडून विश्वास मिळणे गरजेचे आहे.
- संगीता कुलकर्णी, पालक
शाळा सुरू होणार असल्याने स्कूल बस चालकांना सुरक्षेसाठी प्रशिक्षण देणे, स्कूल बसमध्ये थर्मल गन, ऑक्सीमिटरची सुविधा देणे, गाडी निर्जंतुकीकरण करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. विद्यार्थी गाडीत बसताना त्यांची तपासणी केली जाईल. मात्र, स्कूल बस किंवा व्हॅनमधून किती विद्यार्थ्यांना नेता येणार आहे, याबाबत स्पष्टता आलेली नाही. कोरोनामुळे स्कूल बस बंद असल्याने चालक, मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातून सुटका झाली पाहिजे.
- राजेश जुनावणे, अध्यक्ष, पुणे बस ओनर असोसिएशन
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस चालकांनी, मालकांनी 31 डिसेंबरपर्यंत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. कोविडबाबत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. एका गाडीत किती विद्यार्थी असतील, याचा निर्णय शासनस्तरावरून होईल.
- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.