उतारवयात ज्येष्ठांची जगण्यासाठी धडपड

मुले परदेशात व जोडीदारही गमावल्याने एकाकीपणामुळे फरफट
senior citizen
senior citizenesakal

पुणे : खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या केदारी आजोबांची (नाव बदललेले आहे) मुले परदेशात नोकरीला लागली. पुढे तिकडेच ते स्थायिकही झाली. इकडे ज्येष्ठ पती-पत्नी मुलाच्या, नातवंडाच्या आठवणीत आणि एकमेकांच्या साथीने जीवन जगत होते. दुर्दैवाने दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

तेव्हापासून केदारी आजोबा एकाकी जीवन जगत आहेत. शारीरिक व्याधींशी लढतानाच, अक्षरशः अन्न, औषधोपचार आणि आर्थिक परिस्थितीशी दोन हात करताना त्यांची फरफट होत आहे. हे चित्र केवळ एकट्या केदारी आजोबांचेच नाही, तर शहरातील पाच हजारांहून अधिक ज्येष्ठांच्या वाट्याला आले आहे.

senior citizen
आमच्याकडे कुणी लक्ष देणार काय?

मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुले नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी, परदेशात जाऊन स्थायिक होतात. त्यानंतर मात्र इकडे ज्येष्ठ दांपत्य एकमेकांच्या साथीत दिवस काढण्याचे काम करतात. परंतु दोघांपैकी एकाचे निधन झाल्यानंतर मात्र एकाकी जीवन जगताना त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

औषधे, बिले भरणे, स्वच्छता, बॅंकेत जाणे अशा किरकोळ कामांसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. विशेषतः अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठांना सेवा शुश्रृषेसाठी खासगी नर्सिंग ब्युरोच्या केअर टेकरवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते. त्यांना भरमसाट पैसे मोजूनदेखील चांगली सेवा मिळत नाही. त्यांच्याकडून वेळेचे पालन किंवा कामेही नीट होत नसल्याची कैफियत ज्येष्ठ नागरिक मांडतात. अनेकदा त्यांच्याकडून गैरप्रकारही घडत असल्याने ते त्रस्त असतात.

senior citizen
पुणे विद्यापीठाबरोबरच सर्व महाविद्यालयांचे शुल्क होणार कमी

पुणे विद्यापीठाकडून सर्वेक्षण :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव व ‘फेस्कॉम’च्या पुढाकारातून पुणे विद्यापीठातर्फे मे २००८ मध्ये शहरात राहणाऱ्या एकाकी ज्येष्ठ नागरिकांचे विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये पाच हजारांहून अधिक एकाकी ज्येष्ठ नागरिक शहरात वास्तव्य करीत असल्याची माहिती पुढे आली होती.

एकाकी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या :

-तंत्रज्ञानाच्या अभावामुळे दैनंदिन कामे करण्यात अडचणी

- सुख-दुःखात मनातील भावना कोणाकडे व्यक्त करण्याचा प्रश्‍न

-गप्पा मारण्यासाठी भक्कम मानसिक आधाराची नितांत गरज

- किरकोळ कामांसाठीही दुसऱ्यांवर विसंबून राहण्याची वेळ

- खासगी कामांसाठी विश्‍वास ठेवण्याबाबत संभ्रम

senior citizen
बिहार, झारखंडमध्ये पुरस्थिती गंभीर; शेकडो गावांना पाण्याचा वेढा

तुम्हाला ज्येष्ठांसाठी हे करता येईल :

- ज्येष्ठांसाठी निबंध, वक्तृत्व, एकपात्री आदी स्पर्धा घेणे

- त्यांचे मनोरंजन होईल, यादृष्टीने कार्यक्रम राबविणे

- गप्पा मारणे, वृत्तपत्र वाचून दाखवणे

- घर, बाग स्वच्छतेच्या कामामध्ये मदत करणे

- इंटरनेट, समाजमाध्यमांचा वापर कसा करावा, याची माहिती देणे.

"ज्येष्ठ दांपत्य असल्यास किमान एकमेकांना मानसिक आधार मिळतो. मात्र, एकाकी ज्येष्ठांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः कोरोना व लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका एकाकी ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात. सरकारी योजना आहेत, मात्र त्या कागदापुरत्याच मर्यादित आहेत. समाजानेही ही समस्या सुटण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत." - अरुण रोडे, अध्यक्ष, फेस्कॉम.

senior citizen
तालिबाविरोधात आवाज बुलंद; शेकडो नागरिक रस्त्यांवर

"पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून मी एकटाच घरात राहतो. वार्ध्यक्‍यामुळे घरातील कामे करता येत नाहीत. केअर टेकरचा मोबदला देणे परवडत नाही. खानावळीचा आधार आहे, पण मानसिक समाधान नाही. उरलेले आयुष्य कसेबसे जगायचे, इतकेच हातात उरले आहे."- केशव शेलार (नाव बदलेले आहे)

इथे साधा संपर्क :

- फेस्कॉम कार्यालय मोबाईल व व्हॉटस्‌अप क्रमांक - ९८५०८८४३७५

- जनसेवा फाऊंडेशन, सामाजिक न्याय विभाग, राज्य व केंद्र सरकार. - हेल्पलाईन क्रमांक - १४५६७

- पुणे पोलिस ज्येष्ठ नागरिक सहायता हेल्पलाईन क्रमांक - १०९०

- पुणे पोलिस नियंत्रण कक्ष - १००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com