
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतेच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षेला अवघे काही दिवस राहिले असताना विद्यार्थ्यांचा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अभ्यास जोर धरत आहे; परंतु शहरातील अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेची तयारी करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अभ्यासिका सुरू करण्याची मागणी हे विद्यार्थी करत आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जवळपास एक लाख ते सव्वा लाख विद्यार्थी विद्येचे माहेरघर गाठतात. परीक्षांसाठी खासगी कोचिंगबरोबरच अभ्यासिकांनादेखील विशेष महत्त्व आहे. या अभ्यासिकांमध्ये हे विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या अभ्यासिका अनलॉक झाले असले तरीही खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे परीक्षेच्या तारखा जवळ येत आहेत, तर दुसरीकडे अभ्यासिकांना अद्याप टाळे लागले असल्याने विद्यार्थी परीक्षेची तयारी कशी करायची, या पेचात सापडले आहेत.
बीडमधून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वर्षभरापूर्वी पुण्यात आलेले नितीन भिताडे म्हणाले, "भाड्याच्या खोलीमध्ये पूर्णवेळ अभ्यास करणे शक्य होत नाही. म्हणून अभ्यासिकेत जातो. तेथे अन्य विद्यार्थी असल्याने अभ्यास करणे सोपे जाते. एकमेकांच्या नोट्स, पुस्तके वापरता येतात. काही शंका असल्यास अन्य मुलांच्या मदतीने शंकेचे निरसन करणे शक्य होते. तसेच एकमेकांच्या मदतीने मार्गदर्शन मिळते."
तर नवी पेठेत अभ्यासिका चालविणारे उमेश घाडगे म्हणाले, "विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, म्हणून दीड वर्षापूर्वी अभ्यासिका सुरू केली. त्यासाठी जवळपास १० लाख रुपये गुंतविले. परंतु कोरोनामुळे अभ्यासिका बंद असल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे."
'सोशल डिस्टंसिंग'चे पालन करू, पण अभ्यासिका सुरू करा
"गावाकडे किंवा भाडयाच्या खोलीत अभ्यास होत नाही. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी अभ्यासिकेत जातात. आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थी या परीक्षांची तयारी एक-दोन वर्ष झाले करत आहेत. आता परीक्षेच्या तयारीसाठी अवघे काही दिवस आहेत. त्यामुळे आता अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. अभ्यासिका सुरू केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी असणाऱ्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येईल. परंतु अभ्यासिका सुरू कराव्यात. या संदर्भात मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे."
- महेश बडे, एमपीएससी स्टुडंटस् राइटस्
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
- शहरातील अभ्यासिकेची संख्या : ५०० हून अधिक
- अभ्यासिकेचे प्रकार : वातानुकूलित आणि वातानुकूलित नसलेले
- अभ्यासिकेचा दर : ८०० ते १५०० रुपये प्रति महिना
- अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची संख्या : ५००० ते ८०००
- स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आता चालवित आहेत अभ्यासिका
अभ्यासिकेचे महत्त्व :
- एकाग्र चिंताने तासन् तास अभ्यास शक्य
- अभ्यासिकेत अन्य मित्रांच्या नोट्स आणि संदर्भ पुस्तक वापरता येतात
- गट चर्चेसाठी व्यासपीठ खुले असते
- अभ्यासासाठी आवश्यक वातावरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.