लॉकडाउनमुळे पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'आमचा संयम सुटतोय!'

Students-Lockdown
Students-Lockdown

पुणे : वाढत्या लॉकडाऊनमुळे महानगरांत अडकलेल्या विद्यार्थ्यांचा संतापही वाढत आहे. राज्य शासनाने विदेशात अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना राज्यात आणले. त्यांची चाचणी करून त्यांचे योग्य व्यवस्थापन केले. कोटा येथील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस पाठवून त्यांना सुखरूप घरी सोडवले.

आता दिल्ली येथील विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाला फक्त राज्याबाहेरील विद्यार्थ्यांची चिंता आहे का? असा प्रश्न या निमित्ताने पडत आहे.
सरकार राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देऊन माघारी आणत आहे. पण आमच्याबाबत कोणताच निर्णय घेत नाही. आता आमचा संयम सुटत चालला आहे. आम्हाला घरी द्या, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. 

एमपीएससी, यूपीएससीसह वेगळ्या वेगळ्या शाखांचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक, राहुरी यासारख्या अनेक भागात अडकून पडले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून हे विद्यार्थी घरी जाण्यासाठी शासनाला वेगळ्या वेगळ्या पातळीवर विनंती करत आहेत. अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना फोनद्वारे संपर्क केला जात आहे. परंतु यांच्याकडून फक्त आश्वासन मिळत आहे. एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ट्विटरवर देखील ट्रेण्ड सुरू केला आहे. परंतु तरीही शासनाकडून आश्वासक तोडगा किंवा हालचाल होताना दिसत नाही. याव्यतिरिक्त प्रशासनाकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. लवकरच तुम्हाला घरी जाता येईल. अशी उत्तरे मिळत आहेत, पण यापुढे अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या ४५ दिवसानंतरही या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक दडपणाखाली गेले आहेत. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेकांना जेवणाचा डब्बा मिळत नाही. डब्बा मिळाला तरी त्याने पोट भरत नाही. रूम मालक खोली सोडण्यासाठी सतत डोक्यावर बसले आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे पुरेसे पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे मेसचा डब्बा येणे बंद झाले आहे. आई वडील मोठ्या चिंतेत आहेत. घरी त्यांना जेवण जात नाही तर इथे त्यांच्या मुलांना जेवण मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

परराज्यातील विद्यार्थ्यांची चिंता राज्य शासनाला आहे. परंतु राज्यातील विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न हे विद्यार्थी विचारत आहे. विदेशात शिकणारे, बाहेरील राज्यात शिकणारे विद्यार्थी श्रीमंत घरातील आहेत म्हणून त्यांना आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले जातात. वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जातात. परंतु राज्यातील विद्यार्थ्यांना गेल्या ४५ दिवसांपासून फक्त आश्वासन मिळत आहे. त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे हा भेदभाव का केला जात आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर्क वितर्कांचा खेळ विद्यार्थ्यांच्या जीवाशी येत आहे. यावर ताबडतोब निर्णय घेऊन आम्हाला घरी सोडण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रिया :

अहो मग तपासणी करून पाठवा घरी, 14 दिवस विलागीकरणात ठेवा. येवढं पण करता येईलच की? सर्व मुलांचा/अडकलेल्या सर्वांचाच संयम सुटलाय. लाचारासारखी अवस्था झालीय. अगोदरच जावू दिलं असतं तर ही वेळच आली नसती.
- महेश जाधव

कोटा दिल्लीच्या विद्यार्थीसाठी जसे एका रात्री निर्णय घेतले जातात तसंच आमच्यासाठी पण लवकरच निर्णय घेऊन आम्हाला घरी सोडा. आम्ही काही वेगळी मागणी करत नाही.
- स्नेहा मेश्राम

कोटावाले श्रीमंत बापाच्या औलादी आहेत. MPSC वाले गरीब मराठी शेतकऱ्यांची मुलं आहेत.
- गणेश राक्षे 

कोट्यातून मुलांना आणले, दिल्लीतून Upscच्या मुलांना आणायचे सुरू आहे. मुंबई, पुणे रेड झोन असूनही येथील कामगारांना जाण्याची मुभा देऊन  रेल्वे सोडण्यात येत आहे,आमची वेळ येते तेव्हाच खबरदारी का?
- नील गायकवाड

फक्त Mpsc च्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव का?

आम्ही जंगलात राहायला तयार आहोत... कसा तरी दिवस काढू आम्ही.. पण या जीवघेण्या वातावरणातून कोणी बाहेर काढा.. आम्हाला यमराज दिसायलेत आता तर... आत भूकेने मरणार आणि बाहेर काही आणायला गेलो तर कोरोनाने.
- अमरीश 

कोटा आणि दिल्लीमध्ये पेशंट नव्हते काय? त्याच्यापासून कोरोना पसरत नाही आणि पुण्यातल्या मुलांपासून पसरतो असं कसं होईल?? शेतकऱ्यांची मुल आहेत ना...
- किरण शिंदे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com