मी मुमताजवर ‘लाइन’ मारायचो - जितेंद्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

त्यागातच सर्वाधिक आनंद
जितेंद्र म्हणाले, ‘‘मी मद्यपान आणि धूम्रपान करायचो. शूटिंग संपले की सगळे सुरू व्हायचे; पण २० वर्षांपूर्वीच मी हे सर्व सोडले. तेव्हा मला भोगण्यापेक्षा त्यागात सर्वाधिक आनंद असतो, याची अनुभूती झाली. आमच्या काळातील हिरोंच्या रूममध्ये व्हिस्की आणि सोड्याच्या बाटल्या असायच्या. आजच्या हिरोंच्या रूममध्ये डंबेल्स आणि व्यायामाचे साहित्य सापडते, हा खूप मोठा आणि चांगला बदल आहे.’

पुणे - चित्रपटामध्ये काम मिळविण्यासाठी व्ही. शांताराम (अण्णासाहेब) यांच्याकडे मी खूप ‘चमचागिरी’ केली. जितेंद्र हे नाव मला त्यांनीच दिले. ते खूप शिस्तीचे होते. मी मुमताजवर ‘लाइन’ मारायचो, तिने अण्णासाहेबांचे कान भरल्याने मला त्यांची बोलणीही खावी लागली... असे एकाहून एक खुमासदार किस्से सांगत ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांनी त्यांचा जीवनपट उलगडला आणि रसिकांना मनमुराद हसण्याचाही आनंद दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवात जितेंद्र आणि जयाप्रदा यांचा सन्मान करण्यात आला. या दोन्ही कलाकारांनी आयुष्य आणि बॉलिवूडमधील प्रवासातील अनेक अनुभव सांगितले. सिंबायोसिसचा माजी विद्यार्थी असलेला भूषण प्रधान या अभिनेत्याला सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. 

महाविकास आघाडी करणे शक्य नाही; अजित पवारांची घोषणा

जितेंद्र म्हणाले, ‘‘माझा जन्म अमृतसरमध्ये झाला असला, तरी बालपणासह २० वर्षे गिरगावच्या चाळीत गेली. तेथे जी मराठी संस्कृती रुजली, ती आजही माझ्या नसानसांमध्ये भरलेली आहे. कमी पैशांत जग; पण भरपूर जगून घे, हे संस्कार चाळीने माझ्यावर केले. माझ्या आयुष्यात खूप वैभव मला मिळाले; पण त्या चाळीतील २० वर्षांसारखे सुख मला कधीही मिळालेले नाही. त्या वेळी आमच्या घरात ट्यूब लागली, तरी त्याची चर्चा व्हायची. आज माझ्या शेजारी कोण राहते, हेही माहीत नाही.’’

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

नृत्य आणि गाण्यावर माझे प्रेम आहे, असे सांगत जयाप्रदा यांनी याच विषयावरील ‘सरगम’ सिनेमाद्वारे माझा बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला, याचे समाधान आहे. पुणे शहराने मला खूप प्रेम दिले. मराठी भाषा मला आवडते; पण शिकता आली नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले. डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे हे वर्ष आमच्यासाठी खूप भावनिक आहे.’’ दोन्ही कलाकारांच्या चित्रपटातील गीतांचे सादरीकरण यावेळी झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Symbiosis Cultural Festival