विद्यार्थीप्रिय आई-बाबांचा अभिमान 

मृणाल कुलकर्णी 
Saturday, 5 September 2020

कला व शिक्षणक्षेत्रातील नामवंत प्रा. विजय व प्रा. वीणा देव या दांपत्याची कन्या असलेली प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा अल्पकाळ शिक्षणक्षेत्रात होती. या दोघांकडून तिच्यावर विद्यादानासंदर्भात झालेल्या संस्कारांविषयी तिचे मनोगत

Teachers Day Special  : कला व शिक्षणक्षेत्रातील नामवंत प्रा. विजय व प्रा. वीणा देव या दांपत्याची कन्या असलेली प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा अल्प काळ शिक्षणक्षेत्रात होती. या दोघांकडून तिच्यावर विद्यादानासंदर्भात झालेल्या संस्कारांविषयी तिचे मनोगत

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आई आणि बाबांकडून मिळालेल्या संस्कारांबाबत मी दोघांना वेगवेगळं करू शकत नाही. दोघांमध्ये अनेक बाबतींत साम्य जाणवलं. त्यांच्यात समान जीवनमूल्यं दिसली. विद्यार्थ्यांच्या मनात पाठ्यक्रमाच्या बरोबरीने जीवनविषयक निष्ठा त्यांनी रुजवली. आई-बाबा स्वतः ग्रामीण भागांतून आले असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठीचा ध्यास त्यांनी जपला.

Breaking : विद्यार्थ्यांनो, अंतिम वर्ष परीक्षेसाठी 'हे' दोन पर्याय उपलब्ध; आठवडाभरात वेळापत्रक जाहीर होणार!

गावाकडच्या विद्यार्थ्यांच्या बोलण्या-वागण्यातील अवघडलेपण दूर करण्यासाठी त्यांना वाचन, कला आदींचं मर्म समजावून दिलं. मी आणि माझी धाकटी बहीण मधुरा यांना जसं अर्थपूर्ण जगण्याकडे वळायला प्रोत्साहन दिलं तसंच त्यांच्या विद्यार्थ्यांनाही. या संस्कारांमुळेच आम्ही बहिणी कलेच्या प्रांतात मुशाफिरी करू लागलो. जे काही करू ते प्रगल्भतेने पूर्णत्वाला नेण्याची सवय आमच्यातही आली. 

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत​

आई शाहू महाविद्यालयात विभाग प्रमुख होती. तेथे बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील असायचे. त्यांनी निरनिराळ्या स्पर्धांमध्ये शहरी विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड किंवा सरस कामगिरी बजावावी, अभ्यासातील गुणवत्ता वाढवत न्यावी, यासाठी आई दक्ष असायची. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहायची. बाबा स. प. महाविद्यालयातील त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वंकष उन्नतीसाठी स्वतःला वाहून घ्यायचे. ‘केवळ मी आणि माझ्या हातातील प्रकल्प,’ या परिघापुरते संकुचित न राहता, ते दुसऱ्यांच्या कामांतील यशातही रस घेत असत. राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र व इतिहास यांसारख्या त्यांच्या हातखंडा विषयांपलिकडेही अनेक विषयांत ते विद्यार्थ्यांना पुरेपूर मार्गदर्शन करायचे. स्वतःच्या विद्यार्थ्यांशिवाय इतर विषयांतील विद्यार्थीही त्यांच्याकडे मोकळेपणाने सल्ला विचारायला कचरत नसत. त्यांच्या अशा सर्वसमावेशकतेचा प्रभाव माझ्यावरही पडला. अभिनेत्री म्हणून माझ्या कारकीर्दीत मला याचा उपयोग झाला.

विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये पाठवू नका; तंत्र शिक्षण सहसंचालकांचे शैक्षणिक संस्थांना आदेश​

मराठी व इंग्रजी साहित्यातून मी एम. ए. केलं. नंतर भाषाशास्त्र या विषयाची अतिथी प्राध्यापक म्हणून शाहू महाविद्यालयात एका सत्रापुरतं शिकवलंसुद्धा. तेव्हा मला आई - बाबांकडून मिळालेल्या जीवनमूल्यांची शिदोरी उपयोगी पडली. ग्रामीण विद्यार्थ्यांना या नवख्या विषयाचा बाऊ वाटू नये, यासाठी मी प्रयत्न केले. आई-बाबांचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून मोठ्या पदांवर आहेत. काही कलाक्षेत्रात आहेत. ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील आठवणी सांगतात, आई-बाबांकडून मिळालेली समृद्धी सांगतात, तेव्हा मला माझ्या विद्यार्थीप्रिय आई- बाबांचा फार अभिमान वाटतो. 

आई- वडिलांचे बहुमूल्य मार्गदर्शन

  • अर्थपूर्ण जगण्यासाठी प्रोत्साहन
  • सर्वसमावेशकतेचा प्रभाव
  • काही काळ अध्यापनात
  • संस्कारामुळे कलाक्षेत्रात मुसाफिरी

(शब्दांकन - नीला शर्मा)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Day Special Vijay Dev and Mrunal Kulkarni