
बारामतीत कोरोनाचा कहर; प्रशासनाची कसरत सुरूच...
बारामती : परिसरातील कोरोनाग्रस्तांचा आजचा आकडाही 335 होता. कडक लॉकडाऊन होऊनही ही संख्या घटतच नाही असेच चित्र गेले काही दिवस आहे. तीन आठवड्यांहून अधिकचा लॉकडाऊन संपूनही तीनशे रुग्णसंख्या कमी का होत नाही याचा उलगडाच होत नाही. दुसरीकडे मृत्यूची संख्याही आता 316 पर्यंत गेली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे एकट्या बारामती शहर व तालुक्यात मिळून 87506 नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. दररोज एक हजार जणांच्या तपासण्या व त्यात तीनशेहून अधिक रुग्ण पॉझिटीव्ह हे बारामतीचे जणू समीकरणच बनून गेले आहे.
हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर
शहरात कोविड केअर सेंटरसोबतच रुग्णालयातील बेडस व ऑक्सिजन बेडसहीत व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याचा दैनंदिन प्रयत्न सुरु असून ही क्षमताही वाढू लागली आहे, पण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण जो पर्यंत दहा टक्क्यांपेक्षा कमी येत नाही तो पर्यंत परिस्थिती आटोक्यात आहे असे म्हणता येत नाही. गेल्या काही दिवसात सातत्याने रुग्ण पॉझिटीव्ह येण्याची टक्केवारी तीस टक्क्यांहून अधिकची आहे. रुग्णसंख्येने सोळा हजारांचा टप्पा ओलांडला असून आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या 16366 वर गेली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12225 झाली आहे.
हेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू
दरम्यान बारामतीतील स्वॅब तपासणी केंद्रांवरचा ताण हलका करण्यासाठी आजपासून माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे कोविड केअर सेंटर, निंबूत येथील ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव येथेही सकाळी नऊ ते बारा या वेळेत स्वॅब तपासणी केली जाणार आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आता स्वॅब तपासणीसाठी बारामतीला यायची गरज नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. या तिन्ही ठिकाणी विनामूल्य आरटीपीसीआर तपासणी करुन दिली जाणार आहे.
हेही वाचा: जुन्नर : आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी
Web Title: The Number Of Corona Patients Increased In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..