esakal | ‘थ्री टी प्लॅन’मुळे कोरोनावर सहज मात

बोलून बातमी शोधा

Corona
‘थ्री टी प्लॅन’मुळे कोरोनावर सहज मात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड : आई-वडिलांसह १४ दिवस अलगीकरण कक्षात होतो. मनात भीती होती पण सोसायटीतील सहकाऱ्यांच्या मदतीने व त्यांनी दिलेल्या मानसिक आधाराने हिंमत आली. कधीही असे वाटले नाही की, आम्ही घर सोडून राहतोय. सोसायटीचे स्वयंसेवक वेळच्या वेळी नाश्‍ता, जेवण द्यायचे. आमच्याप्रमाणेच इतर रुग्णांचीही त्यांनी उत्तम काळजी घेतली. हे सर्व आमच्या वेदांता सोसायटीचा ‘थ्री टी प्लॅन’मुळे शक्य झाले, हे शब्द आहेत एका उद्योग समूहातील वरिष्ठ व्यवस्थापक पंकज बाविस्कर यांचे. त्यांच्या सोसायटीने स्वतःच अलगीकरण कक्ष उभारला असून, रहिवाशांसाठी उपचाराची सोय केली आहे. ऑक्सिजनचीही येथे सुविधा आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वैद्यकीय, आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे रुग्णासह कुटुंबातील अन्य सदस्यांचेही मानसिक खच्चीकरण होताना दिसते आहे. अशा परिस्थितीत वाकडच्या वेदांता सोसायटीने सभासदांसह कुटुंबीयांच्या वैद्यकीय सुविधांसाठी रामबाण उपाय शोधला आहे. प्रशासनाची वाट न पाहता स्वतःचे स्वतंत्र ‘थ्री टी’ अर्थात टेस्ट (तपासणी), ट्रेस (शोध) अँड ट्रीट (उपचार) असे मॉडेल उभे करून दोन आयसोलेशन (अलगीकरण) कक्ष सुरू केले आहेत. अन्य सोसायट्यांपुढे आदर्श उभा केला आहे. यातील बहुतांश रहिवासी आयटी अभियंते आहेत. त्यातीलच एक पंकज बाविस्कर. त्यांच्यासह आई-वडिलांनाही संसर्ग झाला होता. त्यानंतर सोसायटीतीलच अलगीकरण कक्षात उपचार घेऊन ते बरे झाले आहेत. त्या अनुभवाबाबत पंकज म्हणाले, ‘‘तो अनुभव खरोखरच वेगळा होता. आपणही समाजाचे खरोखरच देणे लागतो, याची जाणीव त्यामुळे झाली. इतर सोसायटींनी स्वतःसाठी असा एक प्रयत्न करावा व आपल्याच सहकाऱ्यांना मानसिक आधार द्यावा, यामुळे आपण कोरोनावर सहज मात करू शकू, असा आत्मविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?

अशी केली सोय

सोसायटीतील काहीजण नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे काही सदनिका रिकाम्या आहेत. त्यांचा वापर पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांच्या अलगीकरणासाठी केला जाईल का? अशी संकल्पना सोसायटीचे अध्यक्ष सोमनाथ धोंडे यांनी मांडली. त्यांना सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फ्लॅटमध्ये सुरू झाले अलगीकरण कक्ष. सध्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये पाच व सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये पाच अशा दहा बेडची सुविधा निर्माण केली आहे.

ऑक्सिजन सुविधाही

सोसायटीने तीन सिलिंडर विकत घेऊन ऑक्सिजन सुविधा उपलब्ध केली आहे. रुग्णांची तपासणी करून औषधे देण्याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्यांचीही मदत घेतली जात आहे. सोसायटीतील रहिवासी डॉ. प्रसाद जवस हे सुद्धा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून मार्गदर्शन करीत आहेत.

हेही वाचा: गांधीजींच्या मनातील रामराज्य

तपासणी शिबिर

सोसायटीतील रहिवासी, सुरक्षा रक्षक, घरकामगार, मजूर, इतर कर्मचारी, नियमित येणारे भाजी विक्रेते यांच्यासह जवळपासच्या रहिवाशांसाठी सोसायटीने कोविड (आरटी-पीसीआर, अँटिजेन) तपासणी शिबिर शनिवारी (ता. २४) आयोजित केले होते. यात दीडशे जणांची तपासणी करण्यात आली.

रहिवाशांचे योगदान

गेल्या वर्षीही सोसायटीने अलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सिलिंडर सुविधा, औषधे व बेड्स अशा सुविधा निर्माण करून दिल्या होत्या. आताही अमृत काळे यांनी स्वतःची सदनिका अलगीकरण कक्षासाठी दिली आहे. अन्य रहिवासीही गरजेनुसार सदनिका देण्यास तयार आहेत. सोमोजित बंडोपाध्याय, विनायक कदम, कौस्तुभ पाटसकर यांनीही या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा: कोव्हिड लस आणि अमेरिकेचे डावपेच !

''प्रशासकीय यंत्रणेवर भार पडू नये, यासाठी आम्ही स्वतःचा अलगीकरण कक्ष सुरू केला. त्यामुळे रुग्णालयातील बेड अडकून पडणार नाहीत. एखाद्या गंभीर रुग्णाला बेड उपलब्ध व्हावा, त्याचे प्राण वाचावे हा प्रामाणिक हेतू आहे, या मागे आहे. असा प्रयत्न मोठ्या सोसायटींनी केल्यास प्रशासनाला नक्कीच मदत होईल.''

- सोमनाथ धोंडे, अध्यक्ष, वेदांता हाउसिंग सोसायटी, वाकड

दृष्टिक्षेपात वेदांता

एकूण सदनिका ः ३४४

रहिवासी संख्या ः १,६६६

रुग्णांसाठी बेड ः १०

ऑक्सिजन सिलिंडर ः ३

हेही वाचा: एक अमेरिकी महिला आणि नाझी स्पाय नेटवर्क