लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा हफ्ता चोरट्यांनी उडवला; भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे कोथरूडमध्ये खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

शहरामध्ये जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. मोबाईल, पैसे, दागिने, पर्स अशा वस्तुंची चोरी करण्याचे प्रकार शहराच्या वेगवेगळ्या भागात घडत आहेत.

पुणे : लग्नासाठी बॅंकेतून काढलेल्या कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी जाणाऱ्या तरुणाकडील रोकड दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी भरदिवसा जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना बुधवारी (ता.30) दुपारी दोन वाजता कोथरुडमधील जितेंद्र अभिषेकी गार्डनसमोर घडली. 

हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश​

या प्रकरणी प्रसाद आढाव (वय 35, रा. वारजे माळवाडी) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद आढाव हे सीसीटीव्ही देखभाल दुरूस्तीचे काम करतात. त्यांनी त्यांच्या लग्नासाठी बॅंकेतून वैयक्तिक कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दुसऱ्या बॅंकेतून 40 हजार रुपयांचे कर्ज घेऊन ते बुधवारी दुपारी दोन वाजता दुसऱ्या बॅंकेत जात होते.

त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्याने जितेंद्र अभिषेकी गार्डनसमोर त्यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावली. त्यामुळे फिर्यादीच्या दुचाकीचा वेग कमी झाला. चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्याकडील 40 हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. संबंधीत चोरट्यांना लवकरच अटक केली जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले. 

चोरट्यांचं धाडस तरी किती; वर्दळीच्या रस्त्यावरून पळवलं मंगळसूत्र!​

दरम्यान, शहरामध्ये जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. मोबाईल, पैसे, दागिने, पर्स अशा वस्तुंची चोरी करण्याचे प्रकार शहराच्या वेगवेगळ्या भागात घडत आहेत. अशा घटनांवर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieves snatch cash from young man who going to repay loan