पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; शहर पोलिस दलातील तिघांना राष्ट्रपती पदक!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

शिसवे आणि डांगे यांना कौशल्यपूर्ण सेवेबद्दल, तर पवार यांना शौर्य पदक देण्यात येणार आहे.

पुणे : शहर पोलिस दलातील सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे आणि विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. शिसवे आणि डांगे यांना कौशल्यपूर्ण सेवेबद्दल, तर पवार यांना शौर्य पदक देण्यात येणार आहे.

पुणेकर कोरोनाशी लढा देत असताना शिसवे यांनी पोलिसांच्या पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची मे २०१९ मध्ये सह पोलिस आयुक्त म्हणून पद्दोन्नत्ती झाली होती. शिसवे हे २००२ च्या बॅचचे आयपीएस आहेत. शिसवे यांना २००८ साली अंतरिक्ष सुरक्षा सेवा पदक आणि हार्डशीप स्पेशल सव्हस पदक मिळाले आहे. आत्तापर्यंतच्या सेवाकाळात त्यांना ५५ बक्षिसांनी गौरविण्यात आले आहे. सेवा करीत असताना अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामाना करण्यासाठी आवश्‍यक असलेली अद्ययावत कौशल्य मिळवण्यासाठी शिसवे यांनी आत्तापर्यंत तीन वेळा परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.

धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या​

पवार यांनी आत्तापर्यंत मुंबई, नागपूर, राज्य शासनाचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि शहरातील गुन्हे शाखेत उत्कृष्टपणे कर्तव्य बजावले आहे. पोलिस दलामध्ये त्यांना आत्तापर्यंत एकूण ४७५ बक्षीसे मिळाली आहेत. २०११ साली त्यांना पोलिस महासंचालकांनी सन्मानचिन्ह आणि २०१९ साली राष्ट्रपतींचे पोलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकरी आंदोलन ते सीमेवर भारत-चीन संघर्ष; वाचा एका क्लिकवर​

एक हजार बनावट कार्ड केले जप्त :
डांगे हे १९९२ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी नागपूर, नाशिक ग्रामीण, ठाणे शहर, धुळे, नंदूरबार याठिकाणी सेवा बजावली आहे. ठाणे येथे नेमणुकीस असताना बनावट क्रेडीट कार्ड तयार करून लोकांची फसवणूक करणा-या टोळीला त्यांनी अटक केली होती. त्यावेळी आरोपींकडून एक हजार बनावट कार्ड जप्त करण्यात आले होते.

राष्ट्रपतींनी नेताजींचा नव्हे, तर अभिनेत्याच्या पोर्ट्रेटचं केलं अनावरण? खरं काय वाचा

देवेंद्र पोटफोडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक :
अग्निशमन सेवेतील वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यांना यापूर्वी २०११ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. २००६ ते ०८ या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून अनेक जनजागृतीपर उपाय योजना केल्या होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three members of Pune city police force announced President Medal