esakal | वाळू चोरांवर थरारक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

वाळू चोर

वाळू चोरांवर थरारक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर : शिंदोडी (ता. शिरूर) येथे घोड नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तब्बल दहा लोखंडी यांत्रिक बोटी महसूल व पोलिस प्रशासनाने थेट नदीपात्रात स्पीड बोटीद्वारे प्रवास करून पकडल्या. वाळूचोर पळून जाण्यात यशस्वी ठरले; मात्र पथकाने या बोटी फोडून नष्ट केल्या. यात वाळूचोरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पहाटेपासून सुरू झालेली ही कारवाई दुपारपर्यंत चालू होती.

हेही वाचा: शासनाने कोविड सेंटर बंद करू नयेत- हर्षवर्धन पाटील

शिरूरच्या तहसीलदार लैला शेख व पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखालील या पथकात नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, मंडल अधिकारी मनिषा खैरे यांच्यासह प्रशांत शेटे, विजय बेंडभर, अशोक बढेकर, ज्ञानेश्‍वर चौधरी, माधव बिराजदार, अमोल कडेकर, अंकुश सुपे, गणेश बिगवत यांचा समावेश होता. शिंदोडीजवळ प्रथम तहसीलदार शेख यांच्या पथकाने छापा टाकला असता तब्बल दहा यांत्रिक बोटींद्वारे

हेही वाचा: घरकुलांसाठीच्या अनुदानात एक लाख रुपायांची वाढ करू : अजित पवार

वाळूउपसा चालू होता. पथकाचा आक्रमक पवित्रा पाहताच वाळूचोरांनी आपल्या बोटी नदी पात्रातूनच पलीकडील श्रीगोंदा हद्दीत दामटल्या. यावेळी पथकानेही स्पीडबोट तैनात करून या बोटींचा पाठलाग केला. दरम्यान, श्रीगोंदा हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी तहसीलदार शेख यांनी श्रीगोंद्याच्या पोलिस व महसूल प्रशासनालाही कळवले. त्यामुळे बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलिस ठाण्याचे अधिकारी जनार्दन सदाफुले, सहायक फौजदार नारायण बारवकर, मंडल अधिकारी घनश्‍याम गवळी, संजय पोटे, आदेश मावळे, ज्ञानेश्‍वर ठोकळ पथकाने त्या बाजूने वाळूचोरांची नाकाबंदी केली. दोन्ही पथकांच्या कचाट्यात सापडलेल्या वाळूचोरांनी कशाबशा बोटी किनाऱ्यालगत नेत उड्या टाकून पलायन केले.

दरम्यान, जिलेटिनच्या साहाय्याने या यांत्रिक बोटींचे तळ फोडून नदीपात्रातच त्या बुडविण्यात आल्या. या धाडसी कारवाईनंतर वाळूचोरांचे धाबे दणाणले असून, या पट्ट्यातील इतर ठिकाणीही बोटी जागेवरच सोडून वाळूचोर पसार झाले.

हेही वाचा: इंदापूर : नो पार्किंग झोनवर पोलीसांचा कारवाईचा बडगा

दरम्यान, शिरूर पोलिसांनी अज्ञात वाळूचोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, ज्यांच्या बोटी होत्या त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस निरीक्षक राऊत यांनी सांगितले. शिरूर तालुक्‍यात कुठेही अवैध वाळूउपसा होत असल्यास महसूल प्रशासनाला तातडीने कळवावे. संबंधितांची नावे गुप्त ठेवून वाळूचोरीविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले.

loading image
go to top