दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगीची मागणी; व्यापाऱ्यांची आयुक्तांकडे धाव

Vikram-Kumar
Vikram-Kumar

पुणे - दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी पुणे व्यापारी महासंघ, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना गुरुवारी निवेदन दिले. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन सुरू झालेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी वेळ वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अधिक मासानिमित्त सध्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक येऊ लागले आहेत. नवरात्र, दसरा, दीपावली जवळ आली आहे. मात्र, सायंकाळी सात वाजता दुकाने बंद करण्यामुळे नोकरदारांना खरेदीसाठी बाहेर पडता येत नाहीत. हे टाळण्यासाठी १७ ऑक्‍टोबरपासून दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी.’ 

तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे नितीन पंडित, संजीव फडतरे, किरण चौहान, जितेंद्र अंबासनकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘गेल्या सहा महिन्यांपासून व्यापारी आर्थिक संकटात आहेत. आत्ता कोठे व्यवहार सुरळीत होऊ लागले तर, दुकाने लवकर बंद करण्याची सक्ती होत आहे.’ यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.

पुणे इलेक्‍ट्रॉनिक्‍स हायर पर्चेस असोसिएशनतर्फे सुरेंद्रसिंग छाबरा म्हणाले, ‘सगळेच व्यवसाय ७ महिन्यांपासून संकटात आहेत. आता कोठे सुरुवात होत आहे, तर दोन तासांनी काय फरक पडणार? गरज असणाऱ्या व्यक्तीच खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. हे लक्षात घेऊन दुकाने बंद करण्याची वेळ वाढविणे गरजेचे आहे.’ 

‘दुकानदारांवरील अन्याय दूर करा’
महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत गुरुवारी निवेदन दिले. ‘नवरात्र, दसरा, दीपावली हे सण जवळ येत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून नागरिक घरातच होते. आता दुकाने उघडली म्हणून नागरिक बाहेर पडत आहेत. परंतु, दुकाने सात वाजताच बंद करण्याच्या आदेशामुळे त्यांची गैरसोय होत आहे.’’

सात महिन्यांपासून खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडलेले नाहीत. आता बाजारपेठ सुरू होत आहे, तर वेळेचा निर्बंध त्रासदायक ठरत आहे. वेळ वाढविली, तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून ग्राहकांची सुरक्षितताही जोपासता येईल. बार, हॉटेल आणि दुकानांच्या वेळा वेगवेगळ्या का?
- दिनेश जैन, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, जय हिंद कलेक्‍शन

हॉटेल, बार यांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही. परंतु, दुकानदारांवर अन्याय करण्याचे महापालिकेचे लॉजिक समजत नाही. ग्राहक, कर्मचाऱ्यांबाबत दुकानदार अधिक जागरूक आहेत. त्याची दखल महापालिकेने घ्यावी. 
- अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पु. ना. गाडगीळ अँड सन्स

ग्राहक खरेदीसाठी बाहेर कधी पडणार? हॉटेल, बार, मॉल यांना १० वाजेपर्यंत परवानगी तर दुकानांना सातपर्यंतच का? किमान रात्री साडेआठपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली, तरच बाजाराच्या अर्थचक्राला गती येईल. 
- सिद्धार्थ शहा, संचालक, चंदुकाका जगताप

कोरोनाच्या संकटामुळे व्यावसायिक २-३ वर्षे मागे गेले आहेत. आता कोठे बाजारपेठ सुरू झाली आहे. परंतु, वेळ अपुरी असेल, तर ग्राहक दुकानांत पोचणार कसे? हॉटेल, बार यांच्या वेळेबद्दल काय करायचे ते त्यांनी करावे. पण, दुकानांवर अन्याय करू नका.
- सुभाष जैन, भागीदार, मेन्स ॲव्हेन्यू 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com