‘ट्रिपल सीट’पोटी दहा लाखांचा दंड

Traffic-Police-Crime
Traffic-Police-Crime

पिंपरी - रस्त्यावर वाहन चालविताना अनेकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे वावडे असल्याचे दिसून येते. ‘ट्रिपल सीट’ दुचाकी वाहन चालविल्याने अपघाताचा धोका संभवत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत राजरोसपणे वाहने दामटली जात आहेत. अशा प्रकारे ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या तब्बल पाच हजार जणांवर वाहतूक विभागाने दीड महिन्यात कारवाई केली असून, दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.

 वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रॅश ड्रायव्हिंग, मोबाईलवर बोलत व विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे या बाबी अपघातास कारणीभूत ठरतात. तरीही वाहनचालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. यासह दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणे हा जणू अनेकांचा छंदच झाला आहे. मात्र, ट्रिपल सीट वाहन चालवीत असताना तोल जाऊन अपघाताचा धोका असतो. दरम्यान, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागांतर्गत असलेल्या सांगवी, हिंजवडी, निगडी, भोसरी, तळवडे, पिंपरी, चिंचवड, चाकण, देहूरोड, आळंदी या दहा विभागांत १ जानेवारी २०२० पासून अद्यापपर्यंत केलेल्या एकूण कारवाईत सर्वाधिक कारवाई ट्रिपल सीट वाहनचालकांवर करण्यात आली. या दीड महिन्यात चार हजार ८९९ चालकांना नऊ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

ट्रिपल सीट अन्‌ हुल्लडबाजी
शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात ट्रिपल सीट जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. ट्रिपल सीट बसून रॅश ड्रायव्हिंग करीत दुचाकी दामटल्या जातात. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसून येते. मात्र, या हुल्लडबाजांमुळे इतर वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताच्या घटनाही घडतात.

दोन आठवड्यांपूर्वी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ट्रिपल सीट जात असलेल्या दुचाकीला कंटेनरची धडक बसल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. यासह मागील महिन्यातदेखील वाकड परिसरात दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com