#Vasantotsav श्रवणसोहळ्याची रमणीय सांगता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - ‘जादूची पेटी’ या अविस्मरणीय मैफलीतून हार्मोनियमवादनाची किमया, ‘आदर्श शिंदे लाइव्ह’मधून घडलेले भक्तिसंगीत, लोकसंगीत व उपशास्त्रीय संगीताचे दर्शन आणि शतकापूर्वीच्या ‘संशयकल्लोळ’ या नाटकाची रसिकांना आजही वाटणारी 
ओढ हे यंदाच्या ‘वसंतोत्सवा’च्या तिसऱ्या व अखेरच्या दिवसाचे विशेष ठरले.

‘वसंतोत्सवा’अधिक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘वसंतोत्सवा’च्या आजच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवसाच्या संगीत मैफलीच्या आरंभी आदित्य ओक यांनी सत्यजित प्रभू यांच्या सहभागाने ‘जादूची पेटी’ या कार्यक्रमातून पेटीवादनाचे विविध प्रकारचे आविष्कार घडवले. पावणेदोनशे वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये जन्मलेल्या पायपेटीत एका चिकित्सक पुणेकराच्या सूचनेवरून बदल करून, निर्माण झालेली सध्याची पेटी, शास्त्रीय ते इतर अनेक प्रकारच्या संगीतात पेटीला मिळालेले अविभाज्य स्थान आदी इतिहास या वेळी सांगण्यात आला. ‘सुरत पिया की,’ ‘शुक्रतारा मंद वारा,’ ‘तोच चंद्रमा नभात,’ ‘चलत मुसाफिर मोह लिया रे,’ ‘वाजले की बारा’ आदी मराठी व हिंदी चित्रपटगीते आदित्य व सत्यजित यांनी वाजवली. 

सिंथेसायझर व पियानिका या वाद्यांवर प्रभू यांनी विविध गीते ऐकवली. त्यांना संजय महाडिक (गिटार), मंदार गोगटे (तालवाद्ये), प्रभाकर मोसमकर (ढोलक), कृष्णा मुसळे (ढोलकी) व प्रसाद पाध्ये (तबला) यांनी साथ केली. 

‘आदर्श शिंदे लाइव्ह’ या मैफलीत आदर्शने भक्तिसंगीत व लोकसंगीत सादर केले. ‘दर्शन दे रे, दे रे भगवंता,’ ‘चल गं सखे पंढरीला,’ ‘उड जाएगा इक दिन पंछी’ यांसह छक्कड आदी वेगवेगळ्या ढंगाची गाणी त्यांनी सादर केली. ‘रंजीश ही सही’ ही गझल राहुल देशपांडे यांच्या सहगायनातून त्यांनी खुलवली. अविनाश चंद्रचूड यांच्या संगीत संयोजनात ही मैफल रंगत गेली. राजेश दामले यांनी  सूत्रसंचालन केले. 

या स्वरोत्सवाचा समारोप ‘सं. संशयकल्लोळ’ या अजरामर नाटकाने झाला. हे नाटक पाहण्यासाठी ज्येष्ठांबरोबरच तरुणाईही आतुर होती. निपुण धर्माधिकारी यांनी केलेल्या संपादित रंगावृत्ती व दिग्दर्शनामुळे कमालीचे परिणाम साधत होते. राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, दीप्ती माटे, सिद्धेश्वर पूरकर, सायली फाटक, सौरभ काडगावकर व वरद साळवेकर यांच्या अभिनयकौशल्याने जिंकून घेतले. ‘मृगनयना रसिक मोहिनी’ (दरबारी), ‘धन्य आनंद दिन’ (वृंदावनी सारंग) अशा निरनिराळ्या रागांवर आधारित नाट्यगीतांनी कान तृप्त झाले. 

‘सुकांत चंद्रानना,’ ‘कर हा करी धरिला शुभांगी,’ ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’ यासारख्या नाट्यगीतांनी बहार आणली. निखिल फाटक (तबला) व राहुल गोळे (ऑर्गन) यांनी पूरक साथ केली.

यांच्या मदतीने रंगला वसंतोत्सव
‘वसंतोत्सवा’चे आयोजन ‘सकाळ’च्या वतीने केले आहे. ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ हे महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. ‘रावेतकर हाउसिंग’ हे पॉवरर्ड बाय प्रायोजक आहेत. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’, ‘सुमधुर’, ‘श्री वेंकटेश बिल्डकॉन’, ‘श्री रामकृष्ण ऑइल मिल्स लाकडी घाणा, ‘चार्वी’ हे सहप्रायोजक, ‘मेहफिल केटरिंग सर्व्हिसेस’ हे फूड पार्टनर आहे. ‘गिरिकंद हॉलिटेज’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

गझलेचे ऐनवेळी ठरले
मी आणि राहुल देशपांडे यांनी मिळून गझल सादर केली. आश्‍चर्याची बाब म्हणजे गझल गायची, हे ऐनवेळी ठरले आणि या नव्या प्रयोगाला रसिकांनी दादही दिली, असे आदर्श शिंदे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. ‘सं. संशयकल्लोळ’चा प्रयोग आठ वर्षांनी आम्ही करतोय. त्यामुळे मोठी उत्सुकता होती, असे अमेय वाघ आणि प्रियांका बर्वे यांनी सांगितले. 

‘वसंतोत्सवा’अधिक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Vasantotsav ceremony