आरोग्यदायी जीवनाचा 'वाटाड्या' हरपला; डॉ. सरदेसाई यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 March 2020

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अशा डॉ. सरदेसाई यांच्या निधनाने निसर्ग आणि वैद्यक क्षेत्राची सुयोग्य सांगड घालणारा आरोग्यदायी जीवनाचा वाटाड्या हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

पुणे : वैद्यकीय विश्‍वातील पितामह, गावोगावच्या तसेच देश-विदेशातील रुग्णांचे श्रद्धास्थान आणि निष्णात डॉक्‍टरांची फौज तयार करणारे उत्कृष्ट शिक्षक आणि रुग्णसेवेचा अक्षरशः वाहून घेतलेलं समर्पित व्यक्तिमत्त्व, 'पुण्यभूषण' डॉ. ह. वि. तथा हणमंत विद्याधर सरदेसाई (वय 87) यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यंसंस्कार करण्यात आले. पत्नी डॉ कुंदा, मुलगा डॉ सुहृद. मुलगी अमला आणि जावई भरत फाटक असा परिवार आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डॉ. सरदेसाई हे 'सकाळ'मधून प्रसिद्ध होत असलेल्या 'फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीचे मार्गदर्शक होते. डॉ. ह. वि. सरदेसाई यांचा जन्म 10 एप्रिल 1933 साली मुंबईत झाला. पुण्यात आणि परदेशात त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1959 पासून ते पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण झाले. त्याच वेळी त्यांनी पुण्यात स्थायिक होऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच पुण्यासारख्या महानगराचा ग्रामवैद्य म्हणून लोकमान्यता मिळविली. ते गेली सात दशके पुण्यात वैद्यकीय सेवा करत होते. ते अगणित रुग्णांचे आधारवड होते. 

- MPSC च्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

वैद्यकशास्त्र, आरोग्य, शरीर आणि मनाचा संबंध यावर साध्या-सोप्या भाषेत सामान्यांचे अव्याहत प्रबोधन करणारे ते धन्वंतरी होते. सिद्धहस्त लेखक, उत्कृष्ट वक्ते असल्याने त्यांच्या व्याख्यानांना मोठी गर्दी होत असे. ते संस्कृत भाषेचे अभ्यासक होते. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व असणारे ते संवादी डॉक्‍टर होते. 

- डी-मार्ट बंद होण्याच्या अफवेने नागरिकांची तारांबळ; खरेदीसाठी उसळली गर्दी

वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी रुग्ण बाहेरगावाहून येत असल्याने रात्री-अपरात्री त्यांना स्टॅंडवर उतरावे लागत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पहाटे तीन वाजल्यापासून दवाखाना उघडण्यास सुरवात केली. त्यामुळे परगावच्या रुग्णांना एका दिवसात पुन्हा घरी जाऊ लागले. रुग्णांविषयी वाटणारा उमाळा व त्यांना आदराने वागविण्याचा स्वभावाच्या बळावर वैद्यकीय व्यवसायातील दीपस्तंभाची योग्यता त्यांनी प्राप्त केली. डॉ. सरदेसाई यांच्या निधनाने त्यांचे असंख्य रुग्ण, शिष्य, सहकारी यांनी निरामय आणि सत्वशील जीवनाचा पथदर्शक हरविल्याची भावना आहे. 

- रोनाल्डोची दर्यादिली; कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेलमध्ये उभारलं हॉस्पिटल!

आरोग्यदायी जीवनाचा वाटाड्या हरपला : उपमुख्यमंत्री 

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अशा डॉ. सरदेसाई यांच्या निधनाने निसर्ग आणि वैद्यक क्षेत्राची सुयोग्य सांगड घालणारा आरोग्यदायी जीवनाचा वाटाड्या हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच साहित्य सेवाही केली. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहित असत. 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती', 'आरोग्याची सुखद पायवाट' यांसारखी आरोग्याविषयी प्रबोधन करणारी अनेक पुस्तक त्यांनी लिहिली होती.

आरोग्यविषयक जनजागृतीचे काम त्यांनी आयुष्यभर केले. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आरोग्य विषयक वाटाड्या हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran Doctor and legendary physician Dr H V Sardesai passed away at 87