चासकमानवरील पाणी चोरीवर शेतकऱ्यांचा आसूड

jategoan lake
jategoan lake

शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द थील गायरानातील अडीच एकर तळे गेल्या वीस वर्षांपासून बेकायदेशीरपणे भरण्याचा गैरउद्योग गावच्या सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांनी उघडकीस आणताच पाटबंधारे खात्याने या तळ्यात या पुढे पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या तळ्यातून सध्याचे पाणी उचलले तरी पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून, या निमित्ताने भविष्यातील लाखो लिटर पाण्याची चोरी शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे बंद झाली आहे. 

जातेगाव खुर्द येथील गट नं.८१ मधील कोरेगाव-धानोरे शाखेच्या चारी क्र.एल-३ वरून अडीच एकर गावतळे गेल्या वीस वर्षांपासून उन्हाळ्याच्या तीव्र पाणी टंचाईत भरले जात होते. हे पाणी गावातील कुणासाठीही उपलब्ध होत नसताना केवळ शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे येथील काही राजकीय मंडळींसाठी पाणी काही खासगी चाऱ्यांनी पाठविले जात असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. 

याबाबत ग्रामस्थांनी खोलवर माहिती मिळविली असता, या तळ्याची ग्रामपंचायतीकडे संपूर्ण देखभाल- दुरुस्तीसाठी वर्ग आहे. मात्र, ग्रामपंचायत कुठलीच मागणी करीत नसताना परस्पर हे तळे भरुन प्रत्येक आवर्तनावेळी लाखो लिटर पाणी या तळ्यात टाकून ते वाया घालविण्याचा कारभार पाटबंधारे खात्याकडून सुरू सुरू होता. 

या तळ्याच्या निमित्ताने काहीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असल्याने दोनच दिवसांपूर्वी याबाबत पाटबंधारे खात्याकडे अर्ज करुन तलावात पाणी न टाकण्याबाबत सरपंच प्रतिक्षा निकाळजे, उपसरपंच अश्विनी खंडाळे, माजी उपसरपंच सविता डोके, सायली मासळकर, एकनाथ मासळकर, महेश मासळकर, संभाजी मासळकर आदींनी कळविले होते. मात्र, गावाला दाद न देता काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूसाठी हे पाणी गेल्या २० वर्षांपासून सलगपणे सोडले जात आहे. 

याबाबत पाण्याची नासाडी व मागणी नसताना पाणी देण्याच्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी व उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविले होते. त्यालाच अनुसरुन पाटबंधारे खात्याने या निवेदनाची दखल घेत कार्यवाही केली. 

चासकमानच्या कालव्याद्वारे पाणी आवर्तनावेळी एकट्या शिरुर तालुक्यात तब्बल ३५ छोटी- मोठी तळी, पाझर तलाव भरले जातात. केवळ कालव्याद्वारे पाणी वितरणाची तरतूद असताना ३५ तळ्यांचा हिशोब पाटबंधारे खाते शेतकऱ्यांना देतच नाही. याबाबत आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यास्तरावर पाठपुरावा सुरू केल्याची माहिती चासकमान पाणी आंदोलनातील प्रमुख शेतकरी समाधान डोके व अ‍ॅड. दिग्विजय पलांडे यांनी दिली. 

जातेगावच्या तलावावर पाणी वापर सोसायटी असली, तरी तिने पाणी घेणे बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारण, हे पाणी तत्काळ बंद करावे, असे आपण तलावावर भेट देवून लगेच खात्याला कळवून त्याची कार्यवाही तत्काळ केली होती. त्यानुसार आता या पुढे या तलावात पाणी टाकले जाणार नाही. शिवाय यातील पाणी वापरलेल्यांकडून दंड आकारणी करुन भविष्यात असे वर्तन झाल्यास संबंधितांवर पाणी चोरीचे गुन्हेही आम्ही दाखल करणार आहोत.
 - प्रेमनाथ शिंदे, शाखा अभियंता, पाटबंधारे खाते, चासकमान विभाग, खेड     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com