पुणे जिल्ह्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत; घरोघरी बाप्पा विराजमान

ganpati bappa.jpg
ganpati bappa.jpg
Updated on

पुणे : यंदा जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा मनोदय सर्वच गणेश मंडळांनी व्यक्‍त केला आहे. असे असले तरी आपल्या आराध्य देवतेची घरोघरी मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदीवर गणेशभक्‍तांचा भर असल्याचे दिसून आले. 
 

पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत बारामतीत बप्पांचे आगमन 

बारामती : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज बारामतीकरांनी विघ्नहर्त्याची घरोघरी मोठ्या भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा केली. कोरोनाचे संकट यंदाच्या गणेशोत्सवावर गडद असले तरी भक्तांचा उत्साह कायमच होता. आज पावसाची रिमझिम अंगावर झेलत बारामतीकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात घरी नेले. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बारामतीकरांचा उत्साह कमालीचा असतो. यंदा कोरोनामुळे सगळीच गणित बिघडून गेली आहेत. अर्थात त्याचा भाविकांच्या उत्साहावर तितकासा परिणाम दिसला नाही. बच्चेकंपनी आज प्रथमच मोठ्या संख्येने गणपतीची मूर्ती खरेदी करताना दिसून आली. अनेकांनी सहकुटुंब बाप्पाला घरी नेले. 

प्रशासनाने आज मंडप उभारणीसह स्टॉल्स लावण्यासही परवानगी दिली नसल्याने रस्त्याच्या कडेला कॉट टाकून अनेकांनी तात्पुरते स्टॉल्स लावत मूर्ती व सजावटीच्या साहित्याची विक्री केली. भिगवण चौकात पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते. 
यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव साजरा केला जाणार नसल्याने त्याचाही विक्रेत्यांच्या विक्रीवर काहीसा परिणाम जाणवला. गणेशोत्सवात जागोजागी रस्त्यावर दिसणारे मंडप, सजावट, ऐकू येणारे भक्तीगीतांचे सूर नसल्याने वातावरण काहीसे निरुत्साहाचे दिसत होते. 

बारामती गणेश फेस्टीव्हल व्हर्च्यूअल...

बारामती गणेश फेस्टिव्हलच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाली. गेल्या अठरा वर्षांपासून सलग सुरू असणाऱ्या गणेश फेस्टिव्हलवर यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेश फेस्टिव्हल साधे पणाने साजरा करण्याचे संयोजन समितीने ठरविल्याची माहिती मुख्य संयोजक किरण गुजर यांनी दिली. बारामतीकरांना मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहता यावेत या साठी संयोजन समितीच्या वतीने यावर्षी फेसबुकच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये दाखविण्यात आलेल्या कार्यक्रमांचे पुनः प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे बारामतीकरांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येतील. या माध्यमातून यंदा बारामती गणेश फेस्टिव्हल देखील व्हर्च्यूअल साजरा होणार आहे. 

जुन्नरला साधेपणाने सोहळा 
जुन्नर : "गणपती बाप्पा मोरया' ... "मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशाची मंदिरामध्ये "श्रीं'ची प्रतिष्ठापना केली. कोरोनामुळे हा सोहळा अत्यंत साधेपणाने संपन्न झाला. 
येथील ग्रामदैवत रविवार पेठ सार्वजनिक गणेश मंडळाने पारंपारिक पद्धतीने पालखीतून श्री गणेशाची मूर्ती नेऊन मंदिरात प्रतिष्ठापना केली. सकाळी घरोघरी मांगल्यपूर्ण वातावरणात श्री ची स्थापना करण्यात आली. अनेक घरातून पूजाविधीसाठी एपचा वापर करण्यात आला. सार्वजनिक मंडळाच्या गणेशाची स्थापना सायंकाळी झाली. जुन्नर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 12 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली तर 140 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली. जुन्नर शहरात मानाच्या 14 गणेश मंडळासह 44 मंडळांनी श्री च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 

उत्सव काळात 39 जणांना बंदी 
जुन्नर पोलिसांनी गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी विविध कलमांनुसार सुमारे 142 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी दिली. यातील 39 जणांना उत्सव काळात तालुक्‍यात बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी उत्सवाच्या काळात प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

रांजणगावात श्री महागणपतीला फुलांची सजावट 

तळेगाव ढमढेरे :  श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आज गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक महागणपतीच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट, आकर्षक सुवर्णालंकार व पोशाख परिधान करण्यात आला होता. महागणपतीचे मंदिर कोरोना संकटामुळे दर्शनासाठी बंद असले तरी ऑनलाईन दर्शनाचा  लाभ सोशल मीडियावर नागरिक घर बसल्या घेत आहेत. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे आज “श्री गणेश चतुर्थी“ निमित्त पहाटे अभिषेक व नित्य नियमीत पूजा करून नैवद्य करण्यात आला. त्यानंतर श्रीं ची सहस्त्र आवर्तने, महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच दुपारी उत्सवमूर्ती पूजा करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर उत्तरव्दार ढोक सांगवी येथील “मुक्तार्इ देवी मंदिरात आरती व जोगवा करण्यात आला. " चतुर्थीनिमित्त प्रगतशिल शेतकरी नानासाहेब  पाचुंदकर पाटील यांच्यातर्फेे श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक व मनमोहक सजावट करण्यात आली होती". अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख,  तहसीलदार लैला शेख यांनी मंदिर परिसराची पाहणी करून शांतता राखण्याचे आवाहन भाविक व ग्रामस्थांना केले. मंदिर परिसरात रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुरेशकुमार राऊत व सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रफुल्ल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गो कोरोना गो'च्या खळदमध्ये घोषणा 

खळद : येथे (ता.पुरंदर) "गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात लाडक्‍या बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तर यावेळी लहान मुलांनी "गो कोरोना गो'च्या घोषणा दिल्या. यावेळी सर्वत्र कोरोनाचे भीषण संकट ओढवले असताना सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करताना शासनाने अनेक निर्बंध घातले असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळाने स्वतःचे गणपतीचे मंदिर उभारले असल्याने त्याठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तर सार्वजनिक उत्सव बंद असले तरी घरगुती गणेशोत्सव साजरा करताना मात्र सर्वत्र उत्साह जाणवत होता. यावेळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी गणपतीचा जयघोष करत गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत करत विधिवत गणपतीची प्रतिष्ठापना केली व यावेळी सर्वत्र असलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी प्रार्थनाही केली. सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी.एस.हाके यांनी गावामध्ये सर्व गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांशी चर्चा करून हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते याला सर्वांनी प्रतिसाद दिला आहे. तर हा उत्सव साजरा होत असताना कोठेही गर्दी होणार नाही, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वजण काळजी घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com