Vidhan Sabha 2019 : पुण्याविषयी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM-Narendra-Modi-Pune
PM-Narendra-Modi-Pune

पुणे : लोकसभेच्या गेल्या निवडणुकीपासून (2014) पुण्यात सहाव्यांदा आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांबद्दल स. प. महाविद्यालयावरील सभेत भरभरून बोलले. त्यामुळे उपस्थितांवर मोदींनी मोहिनी घातल्याचे भासत होते. अन् त्याचमुळे 'मोदी...मोदी'चा जयघोष होत होता.

पुण्यात सभा असल्यामुळे 'कसं काय पुणेकर, बरं हाय का...' अशी मराठीत सुरवात करताना मोदींनी सहज संवाद साधत उपस्थितांना अक्षरशः बोलते केले अन्‌ त्यामुळेच 31 मिनिटांचे भाषण कधी संपले, हे देखील लक्षात आले नाही. 

सभेची वेळ साडेचारची असली तरी चार वाजल्यापासूनच टिळक रस्ता भाजपच्या कार्यकर्त्यांनी भरून वाहू लागला होता. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मिळेल तेथे गाड्या लावत पुणेकरही या सभेला आले होते. तर उपनगरांतून बस भरून नागरिक येत होते. त्यासाठी भाजपचे पुण्यातील 100 नगरसेवक झटत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन वर्षांवर महापालिका निवडणूक आल्याचे जाणवत होते.

भव्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मुक्त वापर, एलईडी स्क्रिनच्या भिंती, आधुनिक साऊंड सिस्टीम, नेटके ब्लॉक यामुळे जाहीर सभा म्हणजे भाजपने कॉर्पोरेट इव्हेंटसारखीच केली. मोदींनी सुमारे 31 मिनिटे भाषण केले. त्यातील 7 ते 9 मिनिटे ते पुण्यावरच बोलले. 

पंतप्रधान मोदी पुण्याबद्दल म्हणाले...

- विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याने मला, भाजपला भरभरून दिले आहे. गेल्यावेळीही येथे सभा झाल्यावर पुणेकरांनी लोकसभा, विधानसभा, महापालिकेला भरपूर आर्शीवाद दिले आहेत, त्यामुळेच मला प्रचंड मोठा जनादेश मिळाला म्हणून पुण्याला माझे नमन.... असे म्हणताच पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. 

- पुण्याचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी म्हणाले, ''देशाचे राजकारण, ध्येय्य-धोरणांची चिकित्सा पुण्यामध्ये होते. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराजांसारखे संत, महात्मा ज्योतिबा-सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक यांच्यासारखे समाजसुधारक, राजगुरू, उमाजी नाईक यांसारख्या क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने पुणे पावन झाले आहे. त्यामुळेच पुण्याची ख्याती देशात आहे.'' 

- आधुनिक काळात उदयाला आलेल्या पुण्याबद्दल मोदी म्हणाले, ''पुणे हे कायमच प्रागतिक शहर ठरले आहे, विज्ञान-तंत्रज्ञानाचा अंगीकार येथे लवकर होतो. माहिती-तंत्रज्ञानाबरोबरच स्टार्टअपचे इनक्‍यूबिशन सेंटर अशीही या शहराची ओळख आहे. त्यामुळेच मला पुणं हे कायम वेगळं वाटतं.'' 

- देशाची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे हे संस्कांरांच्या संस्कृतीबरोबरच स्टार्टअप हब, 'स्किल एज्युकेशन'चेही हे शहर आहे, असेही मोदी यांनी आवर्जुन सांगितले. 

- पुण्यासाठी काय-काय करणार आहे, हे सांगताना, मोदी यांनी "पुण्यासाठी 'कनेक्‍टिव्हिटी' सशक्त करीत आहोत. मेट्रो प्रकल्पाचे लवकरच विस्तारीकरण होईल, पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे काम लवकर पूर्ण होणार असून पुण्यासह राज्यातील नऊ शहरे 'उडाण' योजनेतंर्गत जोडली जात आहेत,'' असे नमूद केले अन् पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा फायदा पुणे शहरालाही होणार असल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com