पुणे : पोलिसांनी विचारल्यावर 14 वर्षांची 'ती' म्हणाली, 'मला आत्महत्या करायचीय!'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता त्यांना हा सगळा प्रकार समजला. 

पर्वती : आजकालची तरूण पिढी मानसिकदृष्ट्या खूप कमकुवत आहे. आणि दिवसेंदिवस ती आणखी कमकुवत होत चालली आहे. या विषयावर खूप संशोधन झाले आहे, आजही होत आहे. याचे अनेक वैज्ञानिक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. याचाच प्रत्यय बुधवारी (ता.11) पुण्यात घडलेल्या घटनेमुळे आला.

- विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

एक 14 वर्षाची मुलगी, वडिलांशी काही कारणांवरून भांडण झाले, त्यानंतर कुणाला काहीच न सांगता ती घरातून बाहेर पडली. हे जीवन संपवावे, असे विचार मनात घोळत असताना ती शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचली. रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता त्यांना हा सगळा प्रकार समजला. 

बुधवारी दत्तवाडी पोलीस स्टेशन पर्वती पोलीस चौकी हद्दीत नेमण्यात आलेले बिट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल इरफान तडवी आणि गणेश कांबळे हे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मित्रमंडळ चौक येथून जात होते. गणेशोत्सव सुरू असल्याने रात्री चोऱ्याचे प्रकार घडू नयेत, म्हणून गस्त घालत असताना त्यांना एक रिक्षा थांबलेली आढळून आली. थोडा संशय आल्याने त्यांनी पाहणी केली असता त्या रिक्षामध्ये 14 वर्षाची मुलगी आढळून आली. 

- अभय योजनेंतर्गत 3 हजार 500 कोटी रुपयांचा कर भरणा

रात्रीच्या सुमारास कुठे फिरते याची विचारपूस केली असता तिने स्वतःचे नाव बिपणा उर्फ दिपू टिक बहादुर अवजी असे सांगितले. त्यावेळी ती विश्व जिमजवळ (कात्रज-कोंढवा रोड, गोकुळ नगर, पुणे) येथे राहत असल्याची माहिती मिळाली. सखोल चौकशी केली असता ती मुलगी वडिलांशी भांडून घरातून बाहेर पडली होती आणि आत्महत्या करण्यास निघाली होती अशी माहिती मिळाली. 

तिच्याजवळ कोणत्याही मौल्यवान वस्तू, मोबाईल या गोष्टी  नव्हत्या. तिला घरी जाण्यास सांगितल्यावरही तिने वारंवार नकार देत 'मला आत्महत्या करायची आहे,' असे म्हणत राहिली. त्या मुलीला पोलिस कॉन्स्टेबल इरफान तडवी यांनी समजून सांगत तिचे मनपरिवर्तन केले व तिला पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास तिचे वडील टिक बहादुर आणि आई सोनू यांच्याकडे सुखरूप ताब्यात दिले.

- अखेर भाजप पक्षप्रवेशावर उदयनराजेंनी अंतिम निर्णय घेतला

ती सुखरूप घरी पोहोचली हे बघून सगळीकडे शोधाशोध करून दमलेल्या घरच्या मंडळीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यावेळी मुलीच्या पालकांनी पोलिसांचे खूप आभार मानले. जर वेळेत पोलिस त्या ठिकाणी पोहचले नसते किंवा त्या मुलीची अधिक चौकशी केली नसती, तर त्या मुलीने चुकीचे पाऊल उचलण्याचा अनर्थ घडला असता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Police asked to her she said I want to commit suicide