esakal | Video: रंगीबेरंगी त्यांची दुनिया, पण 'थर्टी फस्ट'च्या रात्री अख्खं कुटुंब राहिलं उपाशी!
sakal

बोलून बातमी शोधा

New_Year_Eve

"दहा वाजत आले तरीही गिऱ्हाईक नाही, साडे दहा वाजता सगळे बंद होणार. माणसे बाहेर पडणार नाहीत. मग आमचे फुगेही विकणार नाहीत,'' तारा सांगत होती. 

Video: रंगीबेरंगी त्यांची दुनिया, पण 'थर्टी फस्ट'च्या रात्री अख्खं कुटुंब राहिलं उपाशी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "साब, हरसाल 'थर्टी फस्ट' को 4 -5 हजार रुपये का धंदा होता है, तब हमे पांचसौ रुपये मिलते. इस साल तो, दस बजे लेकिन अब तक दो सौ रुपये का भी धंदा नही, क्‍या खायेंगे, बच्चोंको क्‍या खिलाएंगे', कमरेला अवघ्या चार महिन्यांचे कोवळं बाळ बांधून जंगली महाराज रस्त्यावर फुगे विकणारी तारा बोलत होती. तिची तीन मुले तिथेच पदपथावर उपाशीपोटी शांत निजले होते, तर पती रंगीबेरंगी फुगे आकाशात फिरवीत ग्राहकांची आशेने वाट पाहत होता. आता उद्याचे काय ? हा ताराच्या डोळ्यात दिसणारा प्रश्‍न मात्र काळजात सलतच राहीला!

मोठी बातमी: अजित पवार यांनी पुणेकरांना दिलं नववर्षाचं गिफ्ट; वाचा सविस्तर​

डेक्कन नदीपात्रात राहणारे रामू मोहिंदर काळे आणि त्याची पत्नी तारा फुगे विकून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, ख्रिसमस, 31 डिसेंबर किंवा भारताची क्रिकेट मॅच हे दिवस इतरांसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचे असले तरी, रामू आणि तारासाठी मात्र त्या दिवशी जास्तीत जास्त फुगे विकून पुढचे काही दिवस त्यावर उदरनिर्वाह लेकराबाळांचे पोट भरायचे असतात. यावेळी सर्वसामान्य पुणेकरांप्रमाणेच फुग्यांवर पोट असणाऱ्या काही कुटुंबांनाही कोरोनाचा फटका बसला. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरला फुगे विक्रीचा व्यवसाय चांगला होईल, या अपेक्षेने रामू-तारा आणि त्यांच्यासारख्या अनेक कुटुंबांनी उधारीवर हजारो रुपयांचा माल घेतला. मोठ्या प्रमाणात फुगे विकून उधारीचे पैसे देऊन दोन पैसे मिळतील, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. पण कोरोनाने इथेही त्यांची पाठ सोडली नाही. 

Video: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ; सभागृहाबाहेर कार्यकर्ते भिडले!​

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिसेंबरला रात्री साडे दहा वाजल्यापासूनच शहरात जमावबंदी आदेश लागू केल्याने पुणेकर थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे हॉटेलांमध्ये, बाहेर फिरण्यासाठी नेहमीप्रमाणे पुणेकरांची वर्दळ दिसली नाही. पण फुग्यांची गर्दी मात्र रस्त्यांवर दिसत होती. गर्दी नसल्याचा फटका रामू-ताराप्रमाणे इतर फुगेवाल्या कुटुंबांना बसला. 

जंगली महाराज रस्त्यावरील शुभम हॉटेलबाहेर थांबलेली तारा जुन्या साडीने कमरेला बांधलेल्या झोळीत चार महिन्यांचे बाळ घेऊन तिचा पती रामूला साथ देत होती. फुगे घेण्यासाठी लोकांना आग्रह करीत होती. त्यांची मोठी मुलगीही लोकांना फुग्यांचे भाव सांगत फुगे घेण्यासाठी आग्रह करीत होती. तर पलीकडे पदपथाखालील झाडे लावण्याच्या जागेत मातीत तीन भावंडे उपाशीपोटी निजली होती. एखादे दुसरे ग्राहक थांबून फुगे घेण्याचा प्रयत्न करत होते. "दहा वाजत आले तरीही गिऱ्हाईक नाही, साडे दहा वाजता सगळे बंद होणार. माणसे बाहेर पडणार नाहीत. मग आमचे फुगेही विकणार नाहीत,'' तारा सांगत होती. 

'मैं कैसा मुसलमां हूं भाई?'; नसरुद्दीन शहा यांचा व्हिडिओ व्हायरल​

मागच्या वर्षी फुगे विक्रीतून 4-5 हजार रुपयांचा धंदा झाला होता, यंदा दहा वाजले तरी 200 रुपयांचाही धंदा झालेला नाही. उधारीवर माल आणला होता. आता मालच विकला नाही, तर मुलांना खायला घालायचे तरी काय, असा ताराने उपस्थित केलेला प्रश्‍न काळजात खूप उशिरापर्यंत सलत राहिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)