ठायीच बैसोनि करा एकचित्त...

wari1.jpg
wari1.jpg

आळंदी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली. शासनाच्या निर्णयास वारक-यांनी सहमती दर्शविली. पिढ्यानपिढ्या चालत आलेला पायी वारीचा आनंद यंदाच्या वर्षी खंडित झाल्याने उरामध्ये काहीसे दुःख असले तरी समाजभान ठेवत वारक-यांनी ठायीच बैसोनि करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा ही भावना बाळगून पायी वारीऐवजी घरात बसूनच संतांची उपासना करायचे ठरवले.

यंदाच्या वर्षी कोरोनाने थैमान घातले आणि पाचव्या टप्प्यातही रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फटका थेट पायी वारीला झाला. शासनाने पायी वारीस बंदी घातली. तरी अनेक वारक-यांनी शासनाच्या निर्णय होण्या आधीच स्वत:च्या मनाची तयारी केली की आपल्याला यंदा पायी वारीत सामिल होता येणार नाही. कोरोनाचे गांभिर्य आणि भान वारक-यांनी जाणले. संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत एकनाथ या प्रमुख चार पालख्यांनी जाग्यावरच प्रस्थान सोहळा पार पाडून पालखी आपापल्या गावात ठेवण्याचा निर्णय घेतला. देहू आळंदीसारख्या मोठ्या देवस्थानाच्या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने वारक-यांबरोबरच देवस्थान आणि शासनापुढे मोठा पेच होता.

किमान पन्नास लोकांना तरी परवानगी देण्याची भूमिका दोन्ही सोहळ्यातील वारक-यांची होती. मात्र खुद्ध पंढरपूरात कोरोनाचे रूग्ण आहे. पंढरपूरातील स्थानिक नागरिकांनीही बाहेरच्या व्यक्तींस येवू देण्यास नकार दिलेला. पालखी मार्गावरील काही गावांमधे, तालुक्यामधे, जिल्ह्यामधे कोरोनाचा कहर सुरूच आहे. परिणामी शासनाने पालखी सोहळ्यावर बंधने घातली. वारक-यांनी शासनाचा निर्णय स्विकारला. यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेली दक्षता आणि वारक-यांच्या विवेकाचे दर्शन घडले. निर्णयामुळे यंदाच्यावर्षी पायी सोहळा होणार नाही.

थोडीशी खंत निश्चित आहे. मात्र परंपरेबरोबरच समाजहितही महत्वाचे मानून वारक-यांनी शासनाच्या बरोबर असल्याचे सांगत आहे. सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने सरकारच्या या तात्कालिक निर्णयास अनुसरून सर्वांनी पायी वारीबाबत सहमतीची भूमिका घेतली. खरे तर शेतकरी, बारा बलुतेदार आणि सर्वसामान्यपणे कष्टक-यांचे जीवन जगणाराच वारकरी संप्रदायाच बहुसंख्येने आहे. यात महिला, लेकी बाळी आहेत. संतांचे तत्वज्ञान आणि विचाराने प्रेरित होत कष्टक-यांप्रमाणेच बुद्धीजीवांची संख्यांही लक्षणीय आहे. विक्रेते, व्यावसायिक असे वारीमध्ये हजारोंच्या संख्येने विविध प्रकारचे लोक सामिल होतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पायी वारी खंडित झाली. तरी अडचणींवर मात करणारा तोच खरा वारकरी हे वारकरी हे सर्वांनी यावेळी दाखवून दिले. आणि आळंदी, देहू, पंढरपूरला न जाता घरात बसूनच नामस्मरण करून वारी करण्याचा निर्धार अनेक वारक-यांनी व्यक्त केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वारी हे व्रत आहे. हे व्रत पिढ्यानपिढ्या वारक-यांनी सांभाळले. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने वारीला जाता येणार नाही. आज गेलो नाही तर पुढील अनेक वर्षे वारी करता येईल हे वारक-यांनी ठरवले आहे. पंढरीचा पांडुरंग या काळात राऊळी नाही तर भक्तांमधे, चंद्रभागेच्या वाळवंटात असतो ही भावना आजही वारक-यांमधे आहे. पंढरीचा पांडुरंग भक्तांच्या भेटीला येतो हे माहित असल्याने अनेक वारक-यांनी घरात बसूनच विठूरायाची आळवणी करत वारी करायचे निश्चित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com