
Gold Price: जळगावमध्ये सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक तेजी; एका दिवसात 700 रुपयांची मोठी वाढ; जाणून घ्या प्रतितोळा दर
Gold Price Hike: गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. आज मात्र सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सध्या अक्षय्य तृतीया तोंंडावर असल्यामुळे सोने चांदीच्या खरेदीकडे सर्वांचा कल आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत विशेषतः विकसित देशांमध्ये मंदीचा धोका वाढत आहे. त्यामुळेच सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले असून त्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.
भारतात लग्नाचा हंगाम मार्च-एप्रिलपासून सुरू होतो जो दिवाळीपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालतो. किंमत निश्चितच जास्त आहे, परंतु मागणीतही तेजी दिसून येत आहे. जळगावात सोन्याच्या किंमतींने 63 हजारांवर उसळी घेतली आहे.
त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव 63300 रुपयांवर पोहचले आहेत.
सणासुदीच्या मागणीमुळे किंमतीत वाढ होत आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. तेथेही सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. बँकिंग संकटामुळे फेडरल रिझर्व्हची भूमिका मवाळ होत आहे.
त्यामुळे डॉलर कमजोर होत असून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकाही मोठ्या प्रमाणावर भौतिक सोन्याची खरेदी करत आहेत. बँकिंग संकटामुळे मंदीचे संकट अधिक गडद होत आहे. या सर्व बाबींमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे.
सोने का महाग होत आहे?
भारत, चीनसह जगभरातील केंद्रीय बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात
देशात पुन्हा एकदा दागिन्यांची मागणी वाढली आहे
गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वेगाने वाढत आहे
उच्च चलनवाढ आणि मंदावलेली आर्थिक वाढ यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे
जागतिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार सोन्याला पसंती देत आहेत
भारतात आगामी काळात येत असलेले सण आणि लग्नसराई यामुळे मोठी मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचं सोने व्यावसायिक सांगत आहेत.