अवलंबली ‘ती’ संपली ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

self relient women investment international womens day 2023 finance money management

तुम्हाला तुमच्या कुटुंबातील संपूर्ण गुंतवणुकीची, (लॉग इन आणि पासवर्डससह), माहिती आहे का?

अवलंबली ‘ती’ संपली !

खालील सर्व प्रश्नांची उत्तरे ‘होय’ अशी असतील, तर हा लेख तुम्ही नाही वाचला तरी चालेल.

प्रश्न

तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन केले आहे का?

टर्म इन्शुरन्स आणि ‘युलिप’मधील फरक माहिती आहे का?

एसआयपी आणि एसटीपीमधील फरक माहिती आहे का?

तुम्ही किंवा तुमच्या घरातील कर्त्या व्यक्तीने ‘विल’ अर्थात इच्छापत्र केले आहे का?

तुम्हाला तुमच्या कुटुंबातील संपूर्ण गुंतवणुकीची, (लॉग इन आणि पासवर्डससह), माहिती आहे का? तसेच, वेळ आली तर, घरातील कोणाच्याही मदतीशिवाय, तुम्ही ती गुंतवणूक मोडू शकाल का?

बहुतेक जण ‘जागतिक महिला दिन’ उत्साहाने साजरा करतात. मात्र, आजही अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हा विषय पुरुषांच्या अखत्यारीत येतो. आज भारतामध्ये साधारणपणे १० कोटींच्यावर महिला घटस्फोट, वैधव्य किंवा लग्न न झाल्याने अथवा न केल्याने आदी विविध कारणांनी ‘एकट्या’ राहात आहेत आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे.

त्यात मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असेल, तर परिस्थिती खूप आव्हानात्मक आणि बिकट होते. त्यामुळेच, एकीकडे आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याची खरी आवश्यकता महिलांना असते. परंतु, या गोष्टी, पुरुषांच्या ताब्यात असतात आणि महिला यापासून अलिप्त, ‘कम्फर्ट झोन’मध्ये राहणेच पसंत करतात.

प्राप्तिकर जरूर वाचवा ; परंतु, कायद्यानुसारच

बहुतेक वेळा तुमच्या घरातील पुरुष मंडळी, कर वाचविण्याच्या हेतूने किंवा अन्य हेतूने, तुमचे नाव पहिले ठेऊन गुंतवणूक करत असतील, घर घेतांना त्यामध्ये तुमचे नावसुद्धा ठेवत असतील किंवा तुम्हाला त्यांच्या व्यवसायामध्ये भागीदार किंवा संचालक म्हणून दाखवित असतील, तर हे सर्व तज्ज्ञांच्या सल्याने करा. अन्यथा प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते; तसेच व्यवसायामध्ये काही घोळ झाला, तर कोर्टात दोघांना हजर राहावे लागू शकते.

महिलांनी आर्थिक नियोजन करणे आवश्यक

समान शैक्षणिक पात्रता व अनुभव असतांनासुद्धा पुरुषांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत, महिलांना मिळणारे वेतन हे साधारणपणे ३० टक्क्यांनी कमी असते. याचाच अर्थ असा होतो, की महिलांना जास्त बचत आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

उदाहरण: पुरुष ५०,००० महिना कमवून १० टक्के बचत करत असेल, तर वर्षाकाठी तो ६०,००० रुपये बचत करतो. परंतु महिलेला मात्र ३० टक्के वेतन कमी मिळत असल्याने, तिची बचत फक्त ४२,००० रुपये इतकीच होते.

पुरुषांच्या तुलनेत महिला कमी वर्षे काम करतात. मुलांचा जन्म आणि संगोपन याकरीता बहुतेक महिला करिअरमध्ये काही महिने अथवा वर्षे ब्रेक घेतात. साधारणपणे महिला या पुरुषांपेक्षा जास्त वर्षे जगतात. त्यांचे आयुर्मान जास्त असते.

हे करून बघा

  • पती खालील गोष्टी करीत असेल, तर लगेचच ‘लाल झेंडा’ हातात घ्या आणि ‘निषेध’ व्यक्त करा:

  • आयुर्विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत

  • शेअर बाजारामध्ये डेरिव्हेटीव्ह विभागामध्ये गुंतवणूक

  • कर्ज घेऊन शेअर बाजारामध्ये गुंतवणूक

  • गुंतवणूक आणि त्यांचे पासवर्डस तुम्हाला सांगत नसेल

  • योग्य ते नॉमिनेशन नसेल

‘विल’ अर्थात इचछापत्र करीत नसेल

वरील सर्व कारणे उपाय आणि आकडे हेच दाखवितात, की महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त बचत आणि योग्य गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच, अवलंबून राहू नका, आळस करू नका, गुंतवणूक समजावून घ्या, आकड्यांची निष्कारण भीती बाळगू नका, योग्य फी देऊन तज्ज्ञांची मदत घ्या आणि आपले; तसेच आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करा.

टॅग्स :moneyFinanceInvestment