

War portfolio strategy
esakal
श्रीनिवास जाखोटिया,रितेश मुथियान
तेजी व मंदी या गुंतवणुकीतील नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याशिवाय गुंतवणूकरूपी नाण्याला झळाळी येत नाही. तेजीमध्ये आपल्या गुंतवणुकीतून पैसा वाढतो. मंदीमध्ये संधी शोधणाऱ्याला पारसरुपी खजिना सापडतो, तर काही जण मंदीच्या तडाख्यात पैशाबरोबर शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील विश्वास गमावून बसतात. युद्ध ही अनिश्चिततेची परिस्थिती असली तरी त्यातून संधीदेखील निर्माण होतात. योग्य वेळी योग्य क्षेत्रांमध्ये केलेली गुंतवणूक मोठा फायदा देऊ शकते, तर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक राहिल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे ‘सुरू आहे युद्ध, पोर्टफोलिओ करा शुद्ध’ ही केवळ ओळ नसून, सध्याच्या बाजार परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वपूर्ण धोरण ठरू शकते.
अर बाजारात मोठी संधी येते, त्यावेळेस नेमके आपल्याजवळ पैसे नसतात किंवा नवे पैसे गुंतविण्याची धमक म्हणा अथवा विश्वास नसतो. मग अशावेळी करायचे काय, हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. कारण नव्याने शेअर तर घ्यायचे आहेत, मात्र नवे भांडवल गुंतवायचेदेखील नाही, सध्याच्या परिस्थितीत आहे त्या पोर्टफोलिओवर नुकसानदेखील होत आहे. मात्र, नुकसान करून घ्यायची हिंमतही होत नाही, अशी स्थिती बऱ्याच जणांची झाली आहे. आपल्याकडचे शेअर विकून नवी गुंतवणूक केली आणि नेमके तेच शेअर चालले नाहीत तर... आणि जे विकून बसलो आहोत, तेच जोरात वाढायला लागले तर काय, हे आणि या प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनाला नक्की असणार.
गुंतवणुकीच्या प्रवासात हा अवकाळी व गारपिटीचा पाऊस (जसे सध्या सुरू असलेले पश्चिम आशियातील युद्ध) येतोच; जिथे ठरविलेल्या रस्त्याने जायचे (सध्याचा पोर्टफोलिओ ‘जैसे थे’ ठेवायचा), का निर्णय घेऊन नवी पायवाट शोधायची (पूर्वी घेतलेले शेअर विकून नव्या शेअरमध्ये गुंतवणूक) हा प्रश्न उभा राहतो. हीच पायवाट पुढे मुख्य रस्त्याला धरून प्रवास सुखकर होण्याची आशा मात्र आपल्यापैकी सर्वांना असतेच.