पाकचा बागुलबुवा

Shekhar-Gupta
Shekhar-Gupta

शीतयुद्धानंतर २५ वर्षे आंतरराष्ट्रीय समीकरणांमधून पाकिस्तानला दूर करण्याचा प्रयत्न भारताने केला; परंतु मोदी सरकारने नाटकीयरीत्या पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करण्यास नव्याने सुरुवात केली आहे.

केवळ राष्ट्रीय सुरक्षेवर आधारित देशाची व्याख्या काय, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पाकिस्तानपलीकडे बघण्याची आवश्‍यकता नाही. पाकिस्तानची प्रत्येकच गोष्ट राष्ट्रीय सुरक्षा वा असुरक्षिततेवर अवलंबून आहे. म्हणूनच तेथील सत्तेच्या उतरंडीत लष्कर आणि आयएसआयचे स्थान कायमस्वरूपी वरचे राहिले आहे. ही व्यवस्था कायम रहायला हवी, म्हणून मग देशातील २१ कोटी जनतेला सतत भीतीखाली ठेवण्यासाठी काय करता येईल; तर त्यांच्यापुढे एका अक्राळ-विक्राळ राक्षसाची भीतीदायक प्रतिमा उभी करून. त्यात पाकिस्तानचे सत्ताधुरीण आपल्या देशाचा सगळ्यात खतरनाक शत्रू म्हणून भारताची प्रतिमा चितारण्यात यशस्वी ठरले. 

२०१४ पर्यंत पाकिस्तानचा उल्लेख जाहीर सभांमधून जवळपास बाद झाला होता. पाकिस्तानकडे फारतर एक उपद्रवी देश म्हणून बघण्याची आपली मानसिकता तयार झाली होती; परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये स्थिती बदलली असून, पाकिस्तानच्या वेडाने आपल्याला पुन्हा पछाडले आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान संसदेत; तसेच झारखंड निवडणुकीमधील प्रचारात पाकिस्तानचे नाव पुन्हा चर्चेत आले. सर्जिकल स्ट्राइक असो, बालाकोटची कारवाई असो वा नागरिकत्व सुधारणा विधेयक काँग्रेसची भूमिका पाकिस्तानच्या भूमिकेप्रमाणे का असते, असा थेट सवाल अमित शहा यांनी केला. निवडणूक प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनीही अशीच भाषा वापरली. त्यामुळे देशांतर्गत राजकारणासाठी पाकिस्तानचे नाव वापरण्याचा नवा प्रघात आपल्याकडे सुरू झाला आहे. पुलवामा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही आमच्यासोबत आहात की पाकिस्तानसोबत, या मुद्‌द्‌याभोवती प्रचार फिरला. उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या चार मोठ्या राज्यांमधील प्रचारसभांमध्ये मोदी यांच्या भाषणांमध्ये पाकिस्तानचा उल्लेख किमान ९० वेळा झाला. याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र आणि हरियानामधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाली.

१९४७ मध्ये इतिहासाचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या या दोन देशांचे आतापर्यंतची वाटचाल आपण बघू. या वर्षी दोन्ही देशांनी पुढील प्रवासासाठी दोन वेगवेगळ्या वाटा निवडल्या. यातील एक देश राज्यघटनेवर आधारित उदारमतवादी राष्ट्र म्हणून वाटचाल करू लागला; तर दुसरा एका विचारसरणीवर आधारित लष्करशासित मार्गावर निघाला. मात्र, एका विशिष्ट विचारसणीवर आधारित वाटचाल करणाऱ्या देशाला २५ वर्षांत अर्धा भूभाग गमवावा लागला आणि एका तिसराच देश अस्तित्वात आला. या नव्या देशानेही मुस्लिम बहुसंख्य विचारधारा व लष्करी वरचष्म्याचा मार्ग चोखाळला आणि समस्यांचे आगार बनला. तथापि, नंतर या देशाने भारताप्रमाणे धर्मनिरपेक्ष आणि आधुनिक विचारांची कास धरली. 

दुसरीकडे तुकडा पडलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानशी भूभाग लागून असल्याचा फायदा शीतयुद्धाच्या काळात उचलत मोठी लष्करी; तसेच आर्थिक मदत पदरी पाडून घेतली. १९८१ पासून अफगाणिस्तानात वापरलेली युक्ती पाकिस्तानने भारताच्या विरोधात वापरण्यास सुरुवात केली. १९८५ मध्ये मी सर्वप्रथम पाकिस्तानात गेले तेव्हा तेथे बऱ्यापैकी सुबत्ता होती. तेथील दरडोई उत्पन्न भारतापेक्षा ६५ पटींनी अधिक होते. २०१९ मध्ये नेमकी उलट स्थिती आहे. आता आपले दरडोई उत्पन्न पाकिस्तापेक्षा ६० टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पाकिस्तानचा लोकसंख्यावाढीचा दर भारत आणि बांगलादेशच्या दुप्पट आहे. आणि हो त्यांचे पंतप्रधान लष्करप्रमुखांना ‘सलाम’ करतात. कदाचित एकाच गोष्टीत आज ते भारतापेक्षा सरस असतील ती म्हणजे अण्वस्त्रांची संख्या. अशा स्थितीत राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करणे भारताला परवडणारे नाही. 
(अनुवाद - किशोर जामकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com